महिलेचा हात पिरगळणाऱ्या महापौरांना 'मनसे'कडून स्पेशल गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:12 AM2019-08-10T01:12:33+5:302019-08-10T06:40:34+5:30

विरोधकांकडून महापौरांच्या राजीनाम्याची मागणी

Visit MNS to book 'Shiv Chhatrapati's feminine policy' to the mayor | महिलेचा हात पिरगळणाऱ्या महापौरांना 'मनसे'कडून स्पेशल गिफ्ट

महिलेचा हात पिरगळणाऱ्या महापौरांना 'मनसे'कडून स्पेशल गिफ्ट

Next

मुंबई - सांताक्रुझ येथील महिलेचा हात पिरगळ्याप्रकरणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हे प्रकरण विरोधी पक्षांनी लावून धरले असून त्यांच्या राजीनाम्याची व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मनसे कार्यकर्त्यांनी महापौर बंगल्यावर गुरुवारी मोर्चा काढल्यानंतर शुक्रवारी महाडेश्वर यांना ‘शिवछत्रपतींची स्त्री - नीती’ हे पुस्तक भेट देण्यात आले. वांद्रे विधानसभेतून महापौर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मनसेने हा मुद्दा लावून धरल्यामुळे महापौरांचे टेन्शन वाढले आहे.

सांताक्रुझ येथे पटेल नगरमध्ये विजेचा झटका बसून सोमवारी मायलेकाचा मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद त्या विभागात उमटले होते. त्या ठिकाणी पाहणीसाठी आलेल्या महापौरांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्या वेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये महापौरांनी स्थानिक महिलेचा हात पिरगळून तिला धमकावल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करीत महापौरांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे पक्षाने केली आहे. तर मनसेच्या वांद्रे पूर्व विधानसभेतील कार्यकर्त्यांनी महापौरांना शुक्रवारी पुस्तक भेट दिले.

मनसेने दिलेल्या निवेदनात ते प्राध्यापक असल्याची आठवण महापौरांना करून देण्यात आली आहे. तुम्ही मुंबईचे प्रथम नागरिक-महापौर या संविधानिक पदावर विराजमान आहात. असे असतानादेखील महिलेचा हात धरून पिरगळणे अशोभनीय आणि असमर्थनीय कृत्य आहे, अशा शब्दांत त्यांची कानउघाडणी करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा आदर केला जात होता. आपण त्याच मातीत आणि त्याच स्वराज्यात आहोत हे विसरून न जाता महिलांचा सन्मान करा, असे निवेदनात म्हटले आहे.

‘जाहीर माफी मागावी’
मनसे कार्यकर्ते जाणीवपूर्वक या प्रकरणात आपल्याला गोवत असल्याचा बचाव महापौरांनी केला होता. मात्र महापौरांच्या वर्तणुकीमुळे सध्याच्या युगात चाललेल्या नीतिमूल्यांचा ऱ्हास झाला असून, ‘शिवनीती’नुसार ते शिक्षेस पात्र आहेत. स्वत:च्या चुकीची भलामण करीत मनसेवर कोणत्याही प्रकारचे आरोप करून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये. महापौरांनी जाहीर माफी मागावी आणि स्वत:चे आत्मपरीक्षण करावे, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी या वेळी केली.

Web Title: Visit MNS to book 'Shiv Chhatrapati's feminine policy' to the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.