मुंबई : देशभरात प्रसिद्ध असलेली माऊंट मेरीची यात्रा गतवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ८ सप्टेंबर हा दिवस येशू ख्रिस्ताची आई मदर मेरीचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून मुंबईतील माऊंट मेरी चर्चमध्ये मोठी यात्रा भरते. मात्र सध्या यात्रेवर कोरोनाचे सावट असल्या कारणामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही यात्रा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
यंदाही सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरे होणार आहेत. कोरोना महामारी लक्षात घेता, चर्च लोकांसाठी बंदच राहणार आहे. ३ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत मास असणार आहे. तसेच १२ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत फिस्ट तसेच अष्टक असणार आहे. हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. सामाजिक कार्यक्रम तसेच प्रार्थना देखील ऑनलाइन होणार आहेत.
दरवर्षी या उत्सवानिमित्त बेस्ट अधिक गाड्या सोडते; मात्र यंदाही यात्रेवर कोरोनाचे मळभ आहे. या यात्रेमध्ये भारतातून लोक येत असतात. सर्व जात, धर्म, पंथातून लोक चर्चला आवर्जून भेट देतात. बिशप जॉन रॉड्रिग्स म्हणाले की, मागील वर्षाप्रमाणे यंदाही यात्रेवर कोरोनाचे सावट आहे. धार्मिक स्थळे बंद असल्याने यंदा ऑनलाइन पद्धतीने यात्रा साजरी होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच यात्रा साजरी केली जाईल.
काय आहे इतिहास?
माऊंट मेरी हे चर्च १६४० मध्ये बांधले गेले. १७६१ मध्ये या चर्चचे पुनर्निर्माण केले गेले होते. माऊंट मेरी चर्च हे मुंबईतील प्रसिद्ध चर्च आहे. मदर मेरीचा वाढदिवस म्हणून ७ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.