Join us

'वजीर'च्या टीमची लोकमत कार्यालयाला भेट

By admin | Published: January 04, 2016 7:41 PM

फरहान अख्तर आणि आदिती राव हैदरीने सोमवारी 'वजीर' चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने मुंबईतील 'लोकमत' कार्यालयाला भेट दिली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - बॉलिवुडमध्ये अभिनयाचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर अभिनेता  दिग्दर्शनाकडे वळल्याची अनेक उदहारणे सापडतील. पण दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्यानंतर यशस्वी हिरो किती झाले असा प्रश्न समोर आला तर एकच नाव समोर येते ते म्हणजे फरहान अख्तर. 
फरहान अख्तर आणि आदिती राव हैदरीने सोमवारी 'वजीर' चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने मुंबईतील 'लोकमत' कार्यालयाला भेट दिली. यावेळी या दोघांनी लोकमतच्या संपादकीय टीमशी दिलखुलास संवाद साधला. 
'वजीर' या आपल्या चित्रपटाबद्दल बोलतानाच फरहानने पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याबद्दलही भाष्य केले. यावेळी त्यांनी जवानांच्या शौर्याचे कौतुक करत या हल्ल्यात शहीद जवानांना सलाम केला. हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला भयावह असून, यापुढे अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. 

वझीरमध्ये फरहानने दानिश अली हा एटीएस अधिकारी साकारला असून, अमिताभ बच्चन यांचीही मुख्य भूमिका आहे. फरहान आणि अमिताभ दोघे मित्र दाखवले आहेत. एटीएस अधिका-याच्या कर्तव्याइतकचं त्याच व्यक्तीगत आयुष्य या चित्रपटातून मांडण्यात आल्याचं फरहाननं सांगितलं. तसेच, या चित्रपटात अमिताभ बच्चन ग्रॅंडमास्टर असून सर्वांना बुद्धीबऴ कसा खेळायचा याचे धडे देत असतात, असेही फरहानने सांगितले.  
याचबरोबर आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या आपल्या चित्रपटांशी बोलताना सांगितले की, सध्या रॉकऑन-२ चित्रपटाचे काम सुरु असून तो सुध्दा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर डॉन-३ च्या रिमेकबाबत चर्चा सुरु होती. मात्र याबाबत कोणताही सद्धा डोक्यात विचार नसून या सगळ्या अफवा असल्याचे, यावेळी फरहानने सांगितले. फरहान सोबतच अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने सुद्धा वजीर चित्रपट बनविताना आलेले अनुभव लोकमतशी बोलताना शेअर केले.