Join us

जयपूरमध्ये घडणार मुंबईतील वन्यजीवनाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:47 AM

महापालिकेचे प्रदर्शन; जयपूर येथे रंगणार ११वी वर्ल्ड वाइल्डरनेस काँग्रेस

मुंबई : मुंबईतील समृद्ध वन्यजीवन आणि जैवविविधतेचे दर्शन घडविणारे भव्य दालन राजस्थानमधील जयपूर येथे भरविण्यात येणाऱ्या ११व्या वर्ल्ड वाइल्डरनेस काँग्रेसमध्ये उभारण्यात येणार आहे. १९ ते २६ मार्च या कालावधीत होणाºया या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजकत्व मुंबई महापालिका स्वीकारणार आहे. ५२०० चौ. फुटांच्या विस्तीर्ण जागेत हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. परिषदेनंतर हे प्रदर्शन भायखळ्यातील प्राणिसंग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहे.भारताच्या नेतृत्वाखाली, वैश्विक दृष्टिकोन बाळगत वाइल्ड ११ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यासाठी वाइल्डरनेस म्हणजे निर्जन मोकळ्या जागांकरिता चाललेल्या चळवळीची व्याख्या करण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलायची? हे ठरविण्यासाठी जगभरातील प्रतिनिधी या परिषदेच्या मंचावर एकत्र येणार आहेत.नागरिकांचे आयुष्य आनंदी, आरोग्यपूर्ण व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा वाढविण्यासाठी शहरात जैवविविधतेने समृद्ध हरित भूभाग निर्माण करणे व त्यांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत वाइल्ड ११चे महासचिव डॉ. परवीश पंड्या यांनी व्यक्त केले आहे.असे आहे प्रदर्शन...या प्रदर्शनात देश-विदेशातून येणारे पाहुणे, तज्ज्ञ यांना माहिती देण्यासाठी भव्य दालन उभारण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव संरक्षण, पर्यावरण या बाबींना अधोरेखित करणारे भव्य दालन असणार आहे. हे प्रदर्शन दालन कायमस्वरूपी बनविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रदर्शित करण्यात येणाºया बाबी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.आकस्मिक निधीतून खर्च...या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असल्याने मुंबई पालिकेसाठी पाच हजार चौ. फुटांचा कक्ष आरक्षित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका दीड कोटी रुपये राजस्थान सरकारला देणार आहे, तसेच जयपूर प्रदर्शनाचा खर्च आणि प्रदर्शनानंतर राणी बागेत भव्य दालन उभारण्यासाठी काही कोटी खर्च केला जाणार आहेत.या प्रदर्शनासाठी २० अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवास आणि भोजनासाठी ६५ लाखांचा खर्च, एकूण दोन कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च आकस्मिक निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.