मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत व्हिजिट महाराष्ट्रच्या ‘म’ या संकेतचिन्हाचे (लोगो) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल (मंगळवारी) गेट वे ऑफ इंडिया येथे अनावरण करण्यात आले. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जागतिक स्तरावर महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हिजिट महाराष्ट्रचे संकेतचिन्ह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ बनण्याची मोठी क्षमता महाराष्ट्रात आहे. याचबरोबर, आता व्हिजिट महाराष्ट्र ही मोहीम महाराष्ट्राला जागतिक नकाशावर सर्वाधिक पसंतीचे स्थान मिळवून देईल, असा विश्वास सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटनासाठी कृषी, खाण, एअरलाईन्स, कॅब-ॲग्रिगेटर यासह क्रूझ पर्यटनावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. यापुढील काळात विविध क्षेत्रात पर्यटन विकास करण्याचे मार्ग आम्ही शोधत आहोत. जगभरातील पर्यटकांना पुरेशा सोयी - सुविधा पुरवून महाराष्ट्रात पर्यटन वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यात या संकेतचिन्हामुळे चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची पर्यटकांना सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने महामंडळामार्फत ‘म’ हे संकेतचिन्ह सादर करण्यात आले आहे. या संकेतचिन्हाचे (लोगो) अनावरण काल पार पडले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हिजिट महाराष्ट्रच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 9:35 PM