मुंबई विद्यापीठ कुलगुरूंच्या महाविद्यालयांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:54 AM2018-02-05T03:54:09+5:302018-02-05T03:54:19+5:30
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दोन दिवसांत १२ महाविद्यालयांना मॅरेथॉन भेटी दिल्या. या भेटीत कुलगुरूंनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत संगणकाधारित मूल्यांकन असलेल्या आॅनस्क्रीन उत्तरपत्रिका मूल्यांकन सुविधांचीही पाहणी केली.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दोन दिवसांत १२ महाविद्यालयांना मॅरेथॉन भेटी दिल्या. या भेटीत कुलगुरूंनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत संगणकाधारित मूल्यांकन असलेल्या आॅनस्क्रीन उत्तरपत्रिका मूल्यांकन सुविधांचीही पाहणी केली.
कांदिवलीवतील ठाकूर कॉलेजपासून शिंदे यांनी भेटीची सुरुवात केली. येथील बीएमएमच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत ‘संवाद म्हणजे काय?’, ‘संवाद व जनसंवाद यातील फरक काय?’ या विषयांवर कुलगुरूंनी बातचीत केली. तर दुपारी विरार येथील विवा कॉलेजच्या बायोटेकच्या लॅबला भेट देत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुलगुरू म्हणाले की, ‘आजची पिढी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. व्हॉट्सअॅप हे ज्ञानाच्या प्रसारासाठी चांगले माध्यम ठरू शकते. तंत्रज्ञानाचा वापर हा ज्ञानाच्या प्रसारासाठी करावा. या तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करणे गरजेचे आहे. तसेच याचा वापर मानव कल्याणासाठी करणे गरजेचे असल्याचे मतही कुलगुरूंनी व्यक्त केले.
या दौºयात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अनेक महाविद्यालयांतील ग्रंथालय व वाचनालयांसही भेटी दिल्या. दोन दिवसांच्या या भेटीत कुलगुरूंनी त्या-त्या महाविद्यालयातील संगणकाधारित मूल्यांकन असलेल्या आॅनस्क्रीन उत्तरपत्रिका मूल्यांकन सुविधांची पाहणी केली.
दरम्यान, सर्व शिक्षकांनी मूल्यांकनाच्या पद्धतीमध्ये तांत्रिक सुधारणा झाल्याचे सांगितले. मूल्यांकन करताना कोणतीही तांत्रिक अडचण येत नसल्याचे कळताच कुलगुरूंनी शिक्षकांना मूल्यांकनाचा वेग वाढविण्याचे आवाहन केले.
।कुलगुरूंची कलेच्या गावाला भेट
पालघर जिल्ह्यातील नायगाव नजीकच्या जूचंद्र या रांगोळी कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या गावातील पदवी महाविद्यालयास कुलगुरूंनी भेट दिली. या वेळी येथील कलाकारांनी थ्रीडी स्वरूपातील वास्तववादी रांगोळी काढली. ती पाहून भारावलेल्या कुलगुरूंनी अशा कलेसाठी व कलाकारांसाठी मुंबई विद्यापीठ साह्य करील अशी ग्वाही दिली.
प्राचार्यांबरोबर बैठक
बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य व मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व भिवंडी येथील पदवी महाविद्यालयांतील प्राचार्यांना बोलावून आॅनस्क्रीन मार्किंगबाबत एक बैठक आयोजित केली. या बैठकीला २० ते २२ प्राचार्य उपस्थित होते. प्राचार्यांनी आजपर्यंत मुंबई विद्यापीठाला केलेली मदत अशीच सुरू ठेवावी, अशी अपेक्षा कुलगुरू शिंदे यांनी या वेळी व्यक्त केली.