दृष्टिहीन व्यक्तींनी न्यूनगंड बाळगू नये
By admin | Published: September 11, 2014 01:10 AM2014-09-11T01:10:00+5:302014-09-11T01:10:00+5:30
कला ही सर्वांगीण असते़ त्यामुळे तुमच्यातील कलेचा शोध घ्या़ त्यात प्रगती करा. आपण कुठे कमी आहोत, ही भावनाच मनातून काढून टाकली पाहिजे
मुंबई : कला ही सर्वांगीण असते़ त्यामुळे तुमच्यातील कलेचा शोध घ्या़ त्यात प्रगती करा. आपण कुठे कमी आहोत, ही भावनाच मनातून काढून टाकली पाहिजे, असे मत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले. मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे; कारण मुलीच्या शिक्षणामुळे ती पूर्ण घराला घडविण्यासाठी आधार देऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आयोजित ब्रेल लिपीतील कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग - २ चे प्रकाशन सचिन पिळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. दादर येथील कमला मेहता अंधशाळेत पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी पिळगावकर यांनी अंध विद्यार्थिनींशी दिलखुलास संवाद साधला. शिवाय याप्रसंगी या विद्यार्थिनींच्या आग्रहास्तव पिळगावकर यांनी ‘उठा राष्ट्रवीर हो...’ आणि ‘आ चल के तुझे मैं लेके चलू’ ही गाणीही सादर केली. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, मराठी भाषा विभागाचे सचिव श्रीकांत देशपांडे, उपसचिव सतीश जोंधळे आणि नॅबचे संचालक रमण शंकर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थिनी प्रणाली डावरे हिने ‘जीभ’ ही नोंद वाचून दाखविली आणि तिचे साऱ्यांनीच कौतुक केले. सर्व विद्यार्थिनींनी मिळून विश्वकोश गीते म्हटली. तर कन्याकोश गीतावर डहाणूकर महाविद्यालयाच्या आश्लेषा देवळेकर हिने सुंदर नृत्याविष्कार सादर केला. (प्रतिनिधी)