मुंबई : आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यांसमोर दिसतात ते टाळ, मृदुंग, वीणा, पताका घेऊन लाखो जनसमुदायात उपस्थितीत राहणारे निस्सीम माउली भक्त. असाच एक भक्त दादर येथील आगर बाजार विभागातील रामभाऊ बापू लाड. गेले दीड वर्ष कोरोनाच्या सावटामुळे वारी निघाली नाही. पण, आजही दिंडीला खंड पडू नये म्हणून लाड हे दिंडी निघण्याच्या जागी उभे राहून अभंग, विठू नामाचा गजर करतात.
कोकणातील रत्नागिरीत गणेशगुळे या गावी रामभाऊ बापू लाड यांचे बालपण गेले. लहानपणापासून भजनाची आवड, विठ्ठलावर आस्था असली तरी त्या काळी सहसा मृदुंग, पखवाज, टाळ, पेटी कोणाकडे उपलब्ध नसायची. मात्र लोक त्यांची आवड बघून स्वतःजवळ असलेले वाद्य त्यांना वापरण्यास देत असत.
यावर मग हळूहळू एकत्र येत उत्साहाने आदिनाथ भजन मंडळ स्थापन करण्यात आले. आजही वयाच्या ९१ वर्षी उत्साहात, जोशात, मनात असलेली विठूरायावर असलेली नितांत भक्ती; यामुळे ते गेली ४२ वर्षे स्वतःला संपूर्ण झोकून देऊन दादरपासून ते वडाळा (प्रति पंढरपूर) पायी दिंडी वारी करीत आहेत.
आज शेकडो लोक लहानापासून ते वृद्धांपर्यंत पंढरपूरला जातात, या भावनेने दिंडीमध्ये सहभागी होऊन विठूनामाचा गजर करीत वारीचा आनंद घेतात. अभंग, भावगीत, भक्तिगीत तसेच टाळ, मृदुंगाची जोड आणि विठूनामाचा गजर करीत फक्त ओढ असते ती विठुरायाच्या दर्शनाची. रामभाऊ बापू लाड यांना कित्ते भंडारी समाजाकडून गौरविण्यात आले आहे.