विभागीय युवा महोत्सवात विवाचा डंका
By Admin | Published: August 9, 2016 02:12 AM2016-08-09T02:12:11+5:302016-08-09T02:12:11+5:30
मुंबई विद्यापीठाच्या ४९ व्या युवा महोत्सवाची पालघर विभागाची प्राथमिक फेरी विरारच्या विवा महाविद्यालयात पार पडली.
विरार : मुंबई विद्यापीठाच्या ४९ व्या युवा महोत्सवाची पालघर विभागाची प्राथमिक फेरी विरारच्या विवा महाविद्यालयात पार पडली. या महोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत, ललित कला आणि वाडमंय अशा पाच कलाप्रकारांमधील २८ पैकी १४ विभागांत पारितोषिके मिळवत पालघर विभागात विवा महाविद्यालयाने परत एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलें. विशेष म्हणजे यंदा विवा ट्रस्टच्या ज्या इतर महाविद्यालयांनी या महोत्सवात पहिल्यांदाच भाग घेतला होता त्यांनीही चमकदार कामगिरी नोंदवली.
लोकनृत्य स्पर्धेत विवा महाविद्यालयाच्या गोफ रास नृत्याने प्रथम पारितोषिक पटकावले. याचबरोबर मूकाभिनय (प्रथम क्र मांक), मराठी प्रहसन अर्थात स्कीट
(प्रथम क्रमांक), हिंंदी एकपात्री स्पर्धा (प्रथम क्रमांक), मराठी एकांकिका (प्रथम क्रमांक), हिंदी एकांकिका (प्रथम क्रमांक), वेस्टर्न सोलो म्युझिक (प्रथम क्रमांक), इंडियन ग्रुप साँग (प्रथम क्रमांक), इंडियन वोकल क्लासिकल (प्रथम क्रमांक), इंडियन लाईट वोकल (प्रथम क्रमांक), आॅन द स्पॉट पेंटींग (प्रथम क्रमांक), क्ले मॉडेलिंग (द्वितीय क्रमांक), इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा (द्वितीय क्रमांक), मराठी वादविवाद स्पर्धा (उत्तेजनार्थ) या विभागांमध्ये पारितोषिके मिळवली. याशिवाय वेस्टर्न ग्रुप साँग विभागातून विवा महाविद्यालयाच्या चमूची वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे थेट अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व यशस्वी स्पर्धकांची विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
या सर्व स्पर्धांचा निकाल शनिवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आला. याप्रसंगी विवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, चंद्रेश पटेल, विवा महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सहसचिव संजीव पाटील, संजय पिंंगुळकर, सदस्य व्ही. एस. पाटील, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविकिरण भगत, उपप्राचार्या प्राजक्ता परांजपे, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक निलेश सावे, जिल्हा समन्वयक महेश देशमुख यांचसोबत सहभागी शिक्षक समन्वयक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)