लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : सक्तवसुली संचालनालय अर्थात, ईडीने पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी विवा ग्रुपच्या डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर यांना अटक केली असून, २७ जानेवारीपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विवा ग्रुपच्या कार्यालयांमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या घरी असे पाच ठिकाणी शुक्रवारी ईडीने छापेमारी केली होती. काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. नऊ तासांच्या प्रदीर्घ चौकशी व तपासानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी विवा ग्रुपचे डायरेक्टर मदनगोपाल चतुर्वेदी आणि मॅनेजिंग डायरेक्टर मेहुल ठाकूर या दोघांना ताब्यात घेऊन मुंबईच्या कार्यालयात नेले. रात्री या दोघांना ईडीने अटक केली. शनिवारी सकाळी १० वाजता ईडीने सुट्टीकालीन न्यायालयात दोघांना हजर केल्यावर चार दिवसांच्या ईडी कोठडीत त्यांची रवानगी केली आहे. दरम्यान, आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची ही कारवाई झाली असल्याचीही चर्चा वसई तालुक्यात सुरू झाली आहे.