मुंबई- देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगेंडा उभा केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितलं.
भाजपाचे सरकार जेव्हापासून आले, तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. भाजपा देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
तसेच दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होतं. तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरु राहिलं तर देशात एकता राहणार नाही, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या टीकेला आता 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीच उत्तर दिलं आहे.
विवेक अग्निहोत्री ट्विट करत म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी शरद पवार आणि त्यांच्या पत्नीची विमाना प्रवासात भेट घेतली असता त्यांनी चित्रपटासाठी अभिनंदन करत आशीर्वाद दिले. तसंच मीडियासमोर त्यांना काय झालं माहिती नाही. उघड ढोंगीपणा दिसत असतानाही मी त्यांचा आदर करतो, असं विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत.
दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावेळी व्ही. पी. सिंग सत्तेत होते. त्यांना भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा मुद्दा तयार केला जातो. त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झालं ते देशासाठी चांगलं झालं नाही. त्या लोकांना इकडे यावं लागलं ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झालं ते विसरून समाजात एकता कशी राहिल हे पाहिलं पाहिजे, असं शरद पवारांनी सांगितलं.