लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री, यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मात्र ‘भोपाळी’ नागरिकांवर एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. याप्रकरणी त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
रोहित पांडे (२७) या पीआर मॅनेजरने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये अग्निहोत्री विरोधात लेखी तक्रार दिली आहे. पांडे मूळचा मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी आहे. अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत म्हटले होती की, लोक सहसा ‘भोपाळींना’ त्यांच्या नवाबी इच्छांमुळे समलैंगिक समजतात. पण या टीकेवर पांडेने आक्षेप घेतला आहे. मुलाखतीत अग्निहोत्री यांनी कुठेही हे त्यांचे म्हणणे आहे असे सांगितले नाही. परंतु सामान्यतः लोक काय गृहीत धरतात याबाबत भाष्य केले. पण तक्रारदाराने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार करत अग्निहोत्रीविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.