- विशेष प्रतिनिधी मुंबई : १५ वर्षांपूर्वी ‘कंपनी’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा विवेक ओबेरॉय आता प्रत्यक्षात एका कंपनीचा मालक झाला आहे. अमेरिकेत अनिवासी भारतीय हरेश मेहता यांनी २०१२ साली स्थापन केलेल्या ‘स्कायलिमिट इंटिग्रेटेड वेलनेस सोल्युशन्स’ या कंपनीचे ५१ टक्क्यांपेक्षा अधिक समभाग (शेअर्स) विवेकने नुकतेच विकत घेतले आहेत.‘स्कायलिमिट इंटिग्रेटेड वेलनेस सोल्युशन्स’ ही कंपनी आधुनिक अमेरिकन तंत्रज्ञान व परंपरागत औषधांचा वापर करून सांधेदुखी, मेंदूविकार, मज्जासंस्थेचा आजार, लठ्ठपणा यावर नियंत्रण ठेवण्याचा उपचार करते. ‘स्कायलिमिट’चे दोन ‘क्लिनिक्स’ रॉक हिल साऊथ कॅरोलायना व डिकॅटर जॉर्जिया येथे आहेत. दरवर्षी ५०,०००पेक्षा अधिक रुग्ण या औषधोपचार केंद्रांचा लाभ घेतात. स्कायलिमिटने गेल्या वर्षी जुहू बीचजवळ एक औषधोपचार केंद्र उघडले व आज कुलाब्याला वर्ल्ड ट्रेड सेंटरमधल्या दुसºया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येत्या तीन वर्षांत स्कायलिमिटचा विस्तार जगभर करण्यासाठी मेहता आणि ओबेरॉय ५०० कोटी उभे करणार आहेत, अशी माहिती विवेक ओबेरॉय याच्या निकटवर्तीयांनी दिली.
विवेक ओबेरॉय ‘कंपनी’चा मालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 1:52 AM