Join us

विवेक फणसाळकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; संजय पांडे आज होणार सेवानिवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 7:39 AM

आयुक्त पदाच्या रिंगणात १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांच्यासह ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह

मुंबई :  राज्यातील सत्तासंघर्ष वाढत असताना गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच बुधवारी गृहविभागातर्फे  राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. गुरुवारी ते पदभार स्वीकारतील.

आयुक्त पदाच्या रिंगणात १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांच्यासह ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सदानंद दाते, बी. के. उपाध्याय यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, फणसाळकर यांच्याकडे आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. फणसाळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अकोल्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सेवेला सुरुवात करणाऱ्या फणसाळकर यांनी वर्धा, परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. नाशिक, नागपूर, पुण्यामध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर मुंबईत यापूर्वी सह.

आयुक्त वाहतूक, प्रशासन म्हणून काम पाहिले आहे. पुढे, राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महत्त्वपूर्व जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. २०१८ मध्ये त्यांची ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. तेथून यावर्षी फणसाळकर यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळात नियुक्ती करण्यात आली होती. अनेक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणात फणसाळकर यांनी कामगिरी बजावली आहे. नायगाव येथे गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा निरोप समारंभ पार पडणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तपद हे राज्यातील सर्वांत मानाचे पद समजले जाते. सध्या राज्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरील व्यक्ती सातत्याने चर्चेत राहिली आहे.संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईकरांच्या पसंतीस उतरले. मात्र पांडे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर झाली होती.

टॅग्स :मुंबईपोलिस