विक्रोळी विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या मतांचे होणार विभाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 04:36 AM2019-03-20T04:36:33+5:302019-03-20T04:36:53+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत असलेल्या विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांच्या मुलभूत प्रश्नांसोबतच येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास, भांडूप, कांजूरमार्ग आणि विक्रोळीच्या टागोरनगरातील बैठ्या चाळींचा विकास, नव्याने बनलेल्या कांजूर डंम्पिंग ग्राऊण्डच्या मुद्यावर यंदाची लोकसभा निवडणूक आणखी रंगणार आहे.
- मनीषा म्हात्रे
आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत असलेल्या विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांच्या मुलभूत प्रश्नांसोबतच येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास, भांडूप, कांजूरमार्ग आणि विक्रोळीच्या टागोरनगरातील बैठ्या चाळींचा विकास, नव्याने बनलेल्या कांजूर डंम्पिंग ग्राऊण्डच्या मुद्यावर यंदाची लोकसभा निवडणूक आणखी रंगणार आहे. त्यात, भाजप-सेना युती कोणता नवा चेहरा देईल, यावर येथील शिवसैनिक त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
भांडूप पुर्वेकडील नाहूरपासून विक्रोळीच्या गोदरेज कॉलनीपर्यंत विस्तारलेला विक्रोळी विधानसभा मतदारसंघ. नाहूर, भांडूप पूर्व, कांजूरमार्ग आणि विक्रोळी हा मध्यमवर्गीय मराठी बगूल परिसर या मतदारसंघात येतो. भांडूपसह विक्रोळी हा सेनेचा गड मानला जातो. २००९ लोकसभा निवडणुकीत, संजय पाटील विजयी झाले. तर विधानसभेच्या निवडणुकीत, मनसे लाटेत आमदार मंगेश सांगळे यांनी सेनेचे उमेदवार दत्ता दळवी, तसेच माजी खासदार संजय पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा पराभव करत, दुप्पट मतांनी विजय मिळवला. त्यानंतर मात्र चित्र पालटले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार किरीट सोमय्या यांना विक्रोळीतून ७४ हजार ९९ मते मिळाली. तर संजय पाटील यांना ३२ हजार ८८७ मतांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजप उमेदवारासोबत होते.
मोदी लाटेमुळे सोमय्यांच्या मतांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. त्यानंतर मात्र सोमय्या यांच्याशी वाद विकोपाला गेल्याने विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील सेनेच्या गडातूनही त्यांच्याविरुद्ध लढा सुरुच आहे. २०१४मध्ये खासदारकी हरल्यानंतर, संजय पाटील हे आमदारकी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून विक्रोळी विधानसभेसाठी स्वत: रिंगणात उतरले. मात्र, सेनेच्या संजय राऊत यांनी त्यांचा तब्बल ३२ हजार ९०२ मतांनी पराजय केला होता. पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर पोहचले होते.
लोकसभा निवडणूकीसाठी भाजपच्या गोटातून भाजप युवा मोर्चा च्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ईशान्य मुंबई सेनेला तर दक्षिण मुंबई भाजपला सोडण्याच्या वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा या मतदारसंघात आहे. हा मतदारसंघ सेनेला सुटल्यास राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि पक्षाचे उमेदवार संजय दीना पाटील सेनेत प्रवेश करतील आणि उमेदवारी पटकावतील, अशीही कुजबुज ईशान्य मुंबईत आहे. दरम्यान, अखेरची शक्यता लक्षात घेत आचारसंहिता लागू होताच राष्ट्रवादी काँग्रेसने संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. युतीतर्फे उमेदवारी जाहीर झाली नसली तरीही सोमेय्या यांनी आपल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे. पाटील प्रतिस्पर्धी निश्चित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रचारही शांत आहे. त्यामुळे सध्या साहेब कुठे? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
दृष्टीक्षेपात राजकारण
विक्रोळीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सोमय्याविरुद्धचा राग कायम आहे. त्यात, पाटील यांच्या दिशेनेही गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील मतदारांनीही हवी तशी साथ दिली नव्हती.
कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंण्ड सुरू आहे. या डम्पिंग ग्राऊण्डला कांजूरसह विक्रोळीकरांचा विरोध आहे. याविरुद्ध आजवर अनेक आंदोलने झाली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र या मुद्यावर यंदाची निवडणूक रंगणार आहे.
युतीतर्फे उमेदवारी जाहीर झाली नसली तरीही सोमेय्या यांनी आपल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे. पाटील प्रतिस्पर्धी निश्चित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रचारही शांत आहे.
राजकीय घडामोडी
सोमय्याविरुध्दचा राग जाणार नाही. त्यात, मातोश्रीवरुन जो आदेश येणार, त्यावरुनूच पुढची भूमिका घेतली जाईल, असे सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र सेनेच्या काही कार्यकर्ते यांनी मतदान न करण्याची भूमिका घेतल्याचेही समजते.