अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) जारी करण्यात आलेल्या २०२१-२२ साथीच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्थांनी ३१ ऑगस्ट रोजी प्रवेशाची पहिली प्रवेश फेरी संपवावी आणि १५ सप्टेंबरपासून महाविद्यालये सुरू करावे, असे नमूद करण्यात आले आहे; मात्र सद्यपरिस्थितीत देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आणि विशेष म्हणजे अद्याप बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत कोणत्याच मंडळाकडून काहीच निर्णय झालेला नसताना शैक्षणिक संस्थांकडून किमान प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी सदर वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे अवघड असल्याचे मत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता राज्यातील शैक्षणिक संस्थांकडून एआयसीटीईकडून या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुळे देशात केंद्रीय शिक्षण मंडळासह विविध राज्यांतील शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय जून महिन्यात होणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर राज्यांच्या अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. जूनमध्ये परीक्षा जरी झाली तरी त्यांचे निकाल जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अपेक्षित असणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांच्या स्वतंत्र आणि सीईटी प्रवेश प्रक्रियेचा निकालही ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीईटीचा निकाल लागून प्रवेश प्रक्रियेची तयारी आणि प्रवेश सुरू होणे, त्यानंतर वर्ग १५ सप्टेंबरपर्यंत सुरू करणे अशक्यच असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
बारावीच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच एआयसीईटीईने पुढील प्रवेश आणि वर्ग सुरू करण्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा, असे मत क्षेत्रातील शैक्षणिक तज्ज्ञ शिवाय पालक- विद्यार्थी करत आहेत.
मागील वर्षीही अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यासाठी उशीर झाल्याने एआयसीटीईला वेळापत्रकात बदल करावे लागले होते. यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पहिली फेरी, ९ सप्टेंबरपर्यंत दुसरी फेरी संपवून १५ सप्टेंबरपर्यंत कॉलेज सुरू होणे अघड आहे. यामुळे परिषदेने वेळापत्रक मागे घेऊन शिक्षण व्यवस्थेवरील ताण कमी करावा तसेच सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
शैक्षणिक कॅलेंडर
- तंत्रशिक्षण संस्थांना मान्यता मिळण्याची अंतिम मुदत -३० जून
- विद्यापीठ किंवा संस्थांद्वारे मान्यता देण्याची अंतिम मुदत- १५ जुलै
- समुपदेशन / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागा वाटपाची अंतिम मुदत -३१ ऑगस्ट २०२१
- समुपदेशन / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागा वाटपाची अंतिम मुदत -९ सप्टेंबर २०२१
- तंत्रशिसखान अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परताव्याची तारीख -१० सप्टेंबर २०२१
- प्रथम वर्षात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत रिक्त जागांवर प्रवेश मिळून याच दिवसापासून वर्ग सुरू होणार.
- द्वितीय वर्षांमध्ये समांतर प्रवेशाची अखेरची मुदत -२० सप्टेंबर २०२१