आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआय हे तंत्रज्ञान आल्यापासून जगभरातील तंत्रज्ञांवर जणू गंडांतर आलं आहे. सध्या हॅालिवूडमध्ये एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. एआयमुळे प्रोडक्शन हाऊसेसच्या कामाचा व्याप कमी झाला असला तरी तंत्रज्ञांच्या डोक्याचा ताप वाढला आहे. हॅालिवूडमध्ये एका व्हॅाईस आर्टिस्टला अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने तिथे दीड-दोन महिन्यांपासून संप पुकारण्यात आला आहे. भारतातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होऊन डबिंग आर्टिस्टसह बऱ्याच जणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भीती अनेकांच्या मनात आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी असोसिएशन ऑफ व्हॅाईस आर्टिस्टच्या वतीने एका कॅान्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे.
मनोरंजन विश्वासाठी स्वप्नवत वाटावे असे एआय हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आपल्यासाठी शाप आहे की वरदान? हा प्रश्न भारतीय मनोरंजन विश्वातील तंत्रज्ञांनाही सतावत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तसेच मनातील शंकांचं निरसन करण्यासाठी असोसिएशन ऑफ व्हॅाईस आर्टिस्टच्या वतीने २४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता अंधेरी येथील स्टार बाझारच्या वर असलेल्या एलिट हॅालमध्ये एका कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष गणेश दिवेकर यांनी दिली आहे.
या कॉन्फरन्सला सुदेश भोसले, असोसिएशनचे अध्यक्ष गणेश दिवेकर, सचिव अमरिंदर सिंग सोढी, उपाध्यक्ष पवन कालरा, सहसचिव ललित अगरवाल, खजिनदार शाहुल हमीद यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यही उपस्थित राहणार आहेत. एआय या प्रगत तंत्रज्ञानाबाबत प्रत्येकाच्या मनात विविध समज-गैरसमज आहेत. व्हॅाईस रेकॅार्डिंगपासून पटकथा लेखनापर्यंत सर्व कामे एआयच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने केली जात आहेत. याखेरीज एआयकडून विविध पर्यायही दिले जातात. त्यामुळे भविष्यात आपलं काय होणार? ही भीती जवळपास सर्वच तंत्रज्ञाना सतावत आहे. या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं कॅान्फरन्सच्या माध्यमातून शोधली जाणार आहेत. या कॅान्फरन्सला लेखक, डबिंग दिग्दर्शक, तंत्रज्ञ, डबिंग आर्टिस्ट तसेच निर्मातेही उपस्थित राहणार आहेत. याचा भारतीय तंत्रज्ञांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास असोसिएशन ऑफ व्हॅाईस आर्टिस्टचे अध्यक्ष गणेश दिवेकर यांनी व्यक्त केला आहे.