मुंबई : कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या पश्चात त्यांचा आवाज थेट माहीम सार्वजनिक वाचनालयात घुमला आणि अवघे वाचनालय गहिवरले. ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांची संकल्पना असलेल्या बोलगाणी या ध्वनिमुद्रिकेचे रेकॉर्डिंग त्यांनी वाचनालयात सादर केले आणि कविवर्यांच्या आठवणी अधिकच गहिऱ्या झाल्या. हे सादरीकरण म्हणजे कविवर्यांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी पुनर्प्रत्ययाचा आनंद ठरला. या रेकॉर्डिंगमध्ये प्रदीप भिडे यांनी पाडगावकरांशी साधलेला संवाद, त्यांची गाणी, किस्से आदींचा अंतर्भाव होता. पाडगावकरांच्या या बोलगाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांची धुकं धुकं धुकं या मृत्यूचा संदर्भ असलेल्या कवितेचे वाचन करताना, ही माझ्यावरचीच कविता आहे आणि यातला आजोबा मीच आहे, असे पाडगावकरांनी म्हणताच सद्य:काळात त्या कवितेला वेगळाच अर्थ प्राप्त झाला. ज्येष्ठ संस्कृत अभ्यासिका कमल अभ्यंकर यांनी या वेळी मंगेश पाडगावकर यांची आठवण जागवली; तर वैशाली जोशी यांनी पाडगावकर यांच्या कवितेचे वाचन करून त्यांना आदरांजली वाहिली.
वाचनालयात घुमला पाडगावकरांचा आवाज
By admin | Published: January 19, 2016 2:28 AM