मुंबई : पाच आणि सहा दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये वाजवण्यात आलेल्या वाद्यांमुळे कमालीचे ध्वनीप्रदूषण झाले आहे. विसर्जन मिरवणुकांतील आवाजाने ११२ डेसिबलपर्यंतची पातळी गाठली असून, सर्वाधिक ध्वनीप्रदूषण जुहू, दादर, गिरगाव, ग्रँटरोड, वरळी, माहीम परिसरात झाल्याची नोंद आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे शांतता क्षेत्रातही ध्वनीप्रदूषण झाल्याचे आवाजचे म्हणणे असून, यासंदर्भातील कारवाईसाठी त्यांनी मुंबई पोलिसांना निवेदन दिले आहे.गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्या मंडळासह डीजे मालकाविरोधात बोरिवली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अद्याप कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. बोरीवलीतील महागणपती सार्वजनिक मंडळाच्या राजाची रविवारी रात्री विर्सजन मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या वेळी मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याने पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितला. मात्र गोराई रोडवरून जाताना डीजेचा आवाज आणखीनच वाढल्याचे लक्षात येताच पोलीस शिपाई प्रवीण यादव यांनी बोरीवली पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश फर्नांडिस आणि डिजे मालक विजेंद्र गुप्ता यांच्याविरोधात ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे बोरीवली पोलिसांनी सांगितले.
विसर्जनाचा ‘आवाज’ वाढला
By admin | Published: September 13, 2016 3:21 AM