मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग सध्या करण्यात येत आहे.मात्र अती जलद गतीने कोरोनाचे निदान होण्यासाठी व्हाईस बायो मार्कर आर्टिफीशल इंटिलीजन्स आवाजावरून स्क्रीनिंग पद्धतीची चाचणी पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व नेस्को कोविड सेंटर मध्ये दि,7 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. दि,2 जून रोजी सुरू झालेले आणि जंबो फॅसिलिटी असलेले सुसज्ज कोविड सेंटर पालिकेने उभारले असून पश्चिम उपनगरातील नागरिकांना आधारवड ठरत आहे.
आतापर्यंत येथे 5563 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून 4405 रुग्ण कोरोनामुक्त झाले.तर 11 सप्टेंबरला येथे आयसीयू बेड फॅसिलिटी सुरू केली असून एकूण 82 आयसीयू रुग्णांपैकी 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या येथे 48 आयसीयू रुग्णांवर उपचार सुरू आहेत.येथे ऑक्सिजनचे 13000 किलो लिटर्सचे दोन मोठे प्लान्ट असून ऑक्सिजनची कमतरता नाही.
आवाजा वरून स्क्रिनिंगद्वारे कोरोनाचे लवकर निदान करण्याच्या चाचणीला गेल्या दि,5 सप्टेंबर पासून सुरवात झाली आहे.आतापर्यंत 714 नागरिकांचे नमुने गोळा करण्यात आले असून दि,20 ऑक्टोबर पर्यंत 2000 नागरिकांचे नमूने गोळा करण्यात येणार आहेत. सदर नमुने इस्राईल कंपनीला पाठवण्यात येणार असून तीन महिन्यात याचा अहवाल प्राप्त झाल्यावर ही पद्धत योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यावर सदर चाचणीचा उपयोग स्क्रिनिंगसाठी करण्यात येणार असल्याची माहिती नेस्को सेंटरच्या अधिष्ठाता डॉ.नीलम अंद्राडे यांनी लोकमतला दिली.
सदर पद्धत आधुनिक असून अमेरिका व इस्राईल या देशात उपयोगात आणली जात आहे. केवळ 30 सेकंदात कोरोनाची लक्षणे आहेत का नाही याचे निदान या चाचणीवरून समजणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
मराठी,हिंदी, इंग्रजी व गुजराथी या चार भाषेत आवाजाचे नमुने घेण्याची सुविधा इस्राईल कंपनीच्या अँपवर आहे.रुग्णाला कोणत्याही भाषेचा अवलंब करून 1 ते 20 पर्यंतचे आकडे मोजून पाच वेळा खोकायला लागेल.मग दोन्ही आवाजांच्या चाचणीचे नमुने तपासल्यावर रुग्णाला कोरोनाची लक्षणे आहेत का? लक्षणे हीेे सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाची आहेत का हे लवकर समजून येईल.या चाचणीमुळे बाधीत कोरोना रुग्णांवर लवकर उपचार सुरू होतील आणि रुग्ण लवकर कोरोनामुक्त होतील असा विश्वास डॉ.नीलम अंद्राडे यांनी व्यक्त केला.