Join us

व्हॉट्सअ‍ॅपवर वाद; तरुणाची आत्महत्या

By admin | Published: December 26, 2016 6:36 AM

व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या वादातून विशाल रमेश खाडे या तरुणाने रेल्वेमार्गात उडी घेऊन अलीकडेच आत्महत्या केली.

कल्याण : व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या वादातून विशाल रमेश खाडे या तरुणाने रेल्वेमार्गात उडी घेऊन अलीकडेच आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने त्याच्या मोबाइलमधून सेल्फी काढला आणि आत्महत्या का करीत आहे, याचा मेसेज कुटुंबीयांना पाठवला. आपल्यासोबत आत्महत्या करण्यासाठी तो पत्नीला घेऊन गेला होता. मात्र, रेल्वेगाडी जवळ येताच त्याने स्वत: उडी मारली व पत्नीला दूर लोटून दिले. ही घटना वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान २२ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. विशालने आत्महत्या केली असली तरी त्याच्या आत्महत्येची नोंद अपघाती मृत्यू अशी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तरुणाविरोधात त्याच्या कुटुंबीयांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. विशाल राहत असलेल्या टेंभे गावातील एका तरुणासोबत विशालचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वाद झाला. त्या तरुणाने विशालला धमकी दिली होती. यामुळे विशालने त्याच्या भावाला २२ डिसेंबर रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवला. ‘गावातील तरुणाच्या धमक्यांना आपण कंटाळलो असून त्याचा त्रास सहन होत नाही. आपण पत्नी वैष्णवी हिच्यासोबत आत्महत्या करीत आहे.’ विशाल हा मेसेज पाठवल्यावर वैष्णवीला सोबत घेऊन वासिंदनजीक रेल्वेमार्गात गेला. त्यामुळे रेल्वेगाडी जवळ येण्यापूर्वी त्याने सेल्फी काढला. गाडी जशी जवळ आली, तसे त्याने पत्नी वैष्णवीला दूर लोटून स्वत:ला गाडीखाली झोकून दिले. विशालने आत्महत्या केली, याची साक्षीदार त्याची पत्नी आहे. त्याने भावाला पाठवलेला मेसेज हा त्याच्या आत्महत्येचा पुरावा आहे. त्याला धमक्या देणारा तरुण त्याच्याच गावात राहणारा असून मुंबईत ‘बेस्ट’च्या सेवेत आहे. सध्या तो फरार आहे. (प्रतिनिधी)