श्रीकांत जाधवमुंबई : राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अप्रकाशित साहित्याचा आंबेडकर लेखन आणि भाषणे मालिकेतील २३ वा नवीन खंड, ‘जनता’ चे खंड ३ , १९३३ चा ‘जनता खास अंक’, इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद (दोन भाग) इत्यादी नवीन ग्रंथ चैत्यभूमीवर विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. जनता खंड ४, ५ आणि ६ या खंडाचेही प्रकाशन होणार आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे हे अप्रकाशित साहित्य मिळविण्यासाठी भीम अनुयायांची झुंबड उडणार आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाशी संबंधित अनेक अंक, विशेषांक, खास अंक आणि गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘जनता’ वृत्तपत्राचा १९३३ चा खास अंक प्रकाशित करण्यात आला होता. तो बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाशित झालेला पहिला अंक होता. या अंकाचे पुनर्प्रकाशन समितीने केले आहे तसेच ‘जनता’चे ३ खंड प्रकाशित करण्यात आले आहेत.
काही वर्षांपासून डॉ. आंबेडकरांचे खंड प्रकाशित होत नव्हते. त्यामुळे अनेकांची नाराजी होती. परंतु डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने मागील अडीच वर्षांदरम्यान नवीन खंड २३, अनुवादित खंड २, खंड ६ आणि खंड १३ (दोन भाग), जनता ३-१, जनता ३-२ जनता ३-३, जनता खास अंक -१९३३ हे नवीन खंड प्रकाशित केले. त्याशिवाय इंग्रजी खंड ४,६,८,१०,१२,१५,१७ (तीन भाग),१८ (तीन भाग),सोअर्स मटेरियल खंड १ आणि जाती व्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथाच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता,आणि जनता ही वृतपत्रे सुरू केली. यापैकी मूकनायक, बहिष्कृत भारत आणि समता ही पत्रे अल्पकाळातच बंद पडली. परंतु १९३० पासून सुरू झालेले ‘जनता’ हे वृत्तपत्र मात्र दीर्घकाळ चालले. बाबासाहेबांच्या मानवी हक्काच्या चळवळीचा दस्तऐवज म्हणजे ‘जनता’ चे खंड आहेत.- डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती