मुंबई: बेस्ट उपक्रमाचा डोलारा सावरण्यासाठी पालक संस्था या नात्याने महापालिकेने पावले उचलली आहेत़ परंतु आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वेच्छा व सक्तीच्या निवृत्तीचा मार्ग सुचवत कामगारकपातीचे संकेत अर्थसंकल्पातून दिले आहेत़ यामुळे ४४ हजार कामगारांवर कामगारकपातीची टांगती तलवार आहे़ सहा वर्षांपूर्वी ४० लाख प्रवासीवर्ग असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांतून आता २९ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत़ यामुळे ५०९ बसमार्गांपैकी दोनच बसमार्ग सध्या नफ्यात असून, वाहतूक विभाग डबघाईला आला आहे़ कर्जाचा डोंगर वर्षागणिक वाढत असल्याने बेस्टच्या सुटकेचे मार्ग बंद झाले आहेत़ यातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने हात पुढे केला आहे़ मात्र काही अटीही त्यांच्यापुढे ठेवण्यात आल्या आहेत़बेस्ट उपक्रमाला कृती आराखडा सादर करण्याची मुदत पालिकेने दिली आहे़ तसेच अर्थसंकल्पातून २५ कोटी रुपयांची मदत तूर्तास जाहीर करण्यात आली आहे़ त्याचबरोबर बसमार्गांचे सुसूत्रीकरण, बस भाड्याने घेणे आणि बस ताफ्याचा कार्यक्षम वापर आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा व सक्तीच्या निवृत्तीचे उपायही सुचविण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)
बेस्ट कर्मचाऱ्यांवर स्वेच्छा व सक्तीच्या निवृत्तीची टांगती तलवार
By admin | Published: March 31, 2017 7:05 AM