Join us  

राज्यात स्वैच्छिक रक्तदात्यांचे प्रमाण ९९ टक्क्यांपेक्ष अधिक; आज जागतिक रक्तदाता दिन

By संतोष आंधळे | Published: June 13, 2024 10:53 PM

राज्यात रक्तदान करण्याच्या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून देशात सर्वाधिक रक्तदान महाराष्ट्रात होत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई :  राज्यात रक्तदान करण्याच्या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून देशात सर्वाधिक रक्तदान महाराष्ट्रात होत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक रक्तदाता दिन साजरा होत असताना राज्यात ज्या प्रमाणात रक्तदान होते त्यामध्ये ९९ टक्के रक्तदान हे स्वैच्छिक दात्यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिली आहे.

गेल्या वर्षी २०२३ मध्ये, एकूण २०. ४४ लाख युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. त्यामध्ये २०. ३६ लाख स्वैच्छिक रक्तदात्यांनी रक्त दान केले आहे. यामध्ये सर्वाधिक रक्तदान मुंबईत झाले असून ३ लाख १० हजार २४६ युनिट रक्त जमा करण्यात आले आहे. तर ठाणे शहरात १ लाख २४ हजार ५३५ युनिट रक्त जमा झाले असून यासाठी १६७३ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगड मध्ये वर्षभरात ४७,६६० युनिट रक्त जमा करण्यात आले.  

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रक्त दान होत असले तरी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज  राज्याला भासत असते. मोठ्या शस्त्रक्रिया, रस्ते वाहतूक अपघात, प्रसूती, कॅन्सर आणि थॅलेसेमियाचे रुग्ण याकरिता नियमित मोठ्या प्रमाणात रक्तची गरज भासत असते. वर्षभर रक्ताचा पुरवठा सुरळीत असला तरी उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी रक्तची टंचाई भासत असल्याचे दिसून येते. कारण त्या काळात कॉलेजेस बंद असतात, अनेक जण उन्हाळी सुट्ट्यांसाठी बाहेर गेलेले असतात. रक्तदानात कॉलजेच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.    

संपूर्ण राज्यात एकूण ३७६ रक्तपेढ्या असून ७६ पेढ्या या सरकारी आहेत तर अन्य सर्व पेढ्या या ट्रस्ट संचलित आहेत. या सर्व रक्तपेढया मोठ्या प्रमाणत रक्त गोळा करण्याचे काम करीत असतात. त्यामुळे फारसा तुटवडा जाणवत नसला तरी हि नियमित प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी पेढ्याना नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन करावे लागत असते.

आपल्याकडे रक्तदान मोठ्या प्रमाणात होत असले तरी आपली गरजही तेवढी आहे. त्यामुळे रक्तदात्यानी दार तीन महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही. आम्ही सातत्याने रक्तदान जनजगृती बाबत कार्यक्रम घेत असतो रक्तपेढ्याना त्या प्रकारच्या सूचना देत असतो. कारण काही रुग्ण असतात त्यांना नियमित रक्त द्यावे लागते. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता रक्त दात्यांना रक्त दान करावे म्हणून आम्ही आवाहन करत असतो.    

डॉ महेंद्र केंद्रेप्रभारी संचालकमहाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद