ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण वेळापत्रक आखून टप्प्याटप्प्याने करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:33+5:302021-03-26T04:06:33+5:30
मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल - मे महिन्यांत रक्ताचा तुटवडा भासतो. सुट्या ...
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल - मे महिन्यांत रक्ताचा तुटवडा भासतो. सुट्या असल्यामुळे एनजीओ आणि महाविद्यालयांमार्फत होणाऱ्या रक्तदान शिबिरांचे प्रमाण खूप कमी असते.
महाराष्ट्रात ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण वेळापत्रक आखून टप्प्याटप्प्याने झाल्यास काही प्रमाणात रक्ताची चणचण एप्रिल-मे महिन्यात भासणार नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील रक्तदानाचे कार्यक्रम घेणाऱ्या संस्थांशी तसेच महाराष्ट्र रक्त संकलन परिषदेशी संपर्क साधून भविष्यातील रक्ताच्या चणचणीवर मात करता येईल. तसेच लसीकरणाआधी सदर ऐच्छिक रक्तदात्यांचे रक्त घेणे गरजेचे आहे, अशी विनंती राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात एकूण ३४५ रक्त संकलन केंद्रे असून, मुंबईत ५८ आहेत. तर आपल्याकडे सुमारे १०,००० ऐच्छिक रक्तदाते आहेत.
महाराष्ट्रासाठी मासिक १ ते १.५ लाख युनिट्स व मुंबईसाठी मासिक १८,००० ते ३०,००० युनिट्स रक्ताची गरज आहे. त्यामुळे लसीकरणाआधी एप्रिल - मे महिन्यात अगोदर रक्तदान शिबिरे घेणे योग्य राहील, अशी विनंती डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
आता कोविड प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ऐच्छिक रक्तदातेसुद्धा लसीकरणासाठी जाण्याची शक्यता आहे. दोन लसीकरणांचा कालावधी हा ६ ते ८ आठवडे असल्याने त्यांना पुढील ८० ते १०० दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यानंतर त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होण्याचा कालावधी आणि अँटीबॉडीजचे प्रमाण हे सर्व लक्षात घेतल्यास आणि ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण झाल्यास त्यांचा रक्तदाते म्हणून उपयोग होणार नाही, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.