१२३ एसटी कामगारांकडून स्वेच्छा मरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:17 AM2018-03-17T06:17:36+5:302018-03-17T06:17:36+5:30
सुमारे २४ महिन्यांपासून एसटी कामगारांचा वेतन प्रश्न प्रलंबित आहे. ऐन दिवाळीत राज्यभर चार दिवसीय संप पुकारून ही कामगारांचे प्रश्न ‘जैसे थे’आहेत.
मुंबई /पाथरी (जि. परभणी): सुमारे २४ महिन्यांपासून एसटी कामगारांचा वेतन प्रश्न प्रलंबित आहे. ऐन दिवाळीत राज्यभर चार दिवसीय संप पुकारून ही कामगारांचे प्रश्न ‘जैसे थे’आहेत. यामुळे वाहक आणि यांत्रिकांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कामगारांचे प्रश्न सोडवा अथवा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असा इशारा १२३ तरुण कामगारांनी यावेळी दिला आहे. पाथरी आगारातील कामगारांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याकेड निवेदन देत स्वेच्छा मरणाची मागणी
केली आहे. वेतनासाठी एसटी कामगारांनी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप पुकारला होता.एसटी महामंडळ आणि एसटी संघटना यांच्या वादात करार संपून ही कामगारांना २४ महिन्यांपासून वेतनवाढ मिळालेली नाही. यामुळे अखेर कामगारांनी स्वेच्छामरण देण्याचे निवेदन मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना सादर केले आहे.
११ कर्मचाऱ्यांनी केली होती मागणी
फेसबूकच्या माध्यमाने एसटी कर्मचाºयांनी एकत्र येत ‘महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघर्ष ग्रुप’ या नावाने फेसबूक ग्रुप सुरु केला आहे.
राज्यभरातील विविध एसटी विषयक घडामोडी आणि कर्मचाºयांचा समस्या मांडण्यात येतात. या ग्रुपमध्ये महिला, पुरुष, चालक, वाहकांसह एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांचा देखील समावेश आहे. सद्यस्थितीत या ग्रुपमध्ये महामंडाळातील सुमारे २५
टक्के म्हणजेच २६ हजार ५५४ सभासद आहे. एसटी महामंडळात १ लाख ५ हजार अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. या गु्रपमधील ११ कर्मचाºयांनी २७ फेब्रुवारी रोजी स्वेच्छामरणाची मागणी केली होती.