लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कॉर्डिलिया क्रूझमधील अमली पदार्थांच्या प्रकरणात अडकलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट देणारे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी संजय कुमार सिंह यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे. ३० एप्रिलला त्यांना स्वेच्छानिवृत्ती मिळणार आहे. ते सध्या नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो (एनसीबी) मध्ये उप-महासंचालक आहेत. निवृत्तीला आठ महिने शिल्लक असतानाच त्यांनी व्यक्तिगत कारण सांगत स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे.
एनसीबीमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या संजय कुमार सिंह या आयपीएस अधिकाऱ्याकडे एनसीबीच्या दक्षिण-पश्चिम व दक्षिण भारताचा कार्यभार आहे. आर्यनच्या प्रकरणाची सूत्रे देखील त्यांच्याकडेच होती. चौकशीअंती त्यांनी आर्यनला क्लीन चिट दिली होती. एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात जे विशेष चौकशी पथक तयार करण्यात आले होते, त्याची धुराही त्यांनीच सांभाळली. त्यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे सीबीआयने वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.