मुंबई : वर्षअखेरीपर्यंत एअर इंडिया आणि विस्तारा या दोन कंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे. या प्रक्रियेचा फटका एअर इंडियातील ६०० कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता असून, या कर्मचाऱ्यांसाठी येत्या काही दिवसांत स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू केली जाणार असल्याची माहिती आहे.
एअर इंडिया कंपनीत सद्य:स्थितीत कायमस्वरूपी आणि कंत्राटी असे एकूण १९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत, तर विस्तारा कंपनीच्या ताफ्यात साडेसहा हजार कर्मचारी आहेत. या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण वर्षअखेरपर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे एअर इंडियातील ६०० कर्मचाऱ्यांना व्हीआरएसचा पर्याय देण्याचा विचार व्यवस्थापन करीत असल्याचे समजते.
वैमानिक आणि केबिन कर्मचारी विभागात कर्मचारी कपात होणार नाही. मात्र, अन्य विभागांत ही कपात होणार आहे. या विलीनीकरणानंतर एकाच कामासाठी दोन कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या कामाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर काही कर्मचाऱ्यांना अन्य कौशल्य प्रशिक्षण देऊन दुसऱ्या विभागात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे, तर काही कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अन्य ठिकाणच्या कार्यालयातही बदली करून पाठविले जाऊ शकते. स्वेच्छानिवृत्तीसोबत आरोग्यविषयक सुविधा, तसेच अन्य सुविधांदेखील देण्यावर विचार सुरू असल्याची माहिती आहे.