मुंबई : महावितरणमधील ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या श्रमजीवी जनमित्रांना दैनंदिन कामकाज करताना वयोमानानुसार अडचण येत असल्याच्या कारणास्तव केवळ लाइनस्टाफसाठी पुन्हा स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेसोबत झालेल्या बैठकीत कार्यकारी संचालक नीलेश गटणे यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. वयोमानामुळे जनमित्रांना पोलवर चढणे, पेट्रोलिंग करीत दुरुस्ती करणे आदी कामे करताना होणारा त्रास लक्षात घेता याची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बैठकीदरम्यान मासिक वाहन भत्ता ७५० रुपयांऐवजी एक हजार रुपये देण्याचे परिपत्रक काढण्यात येईल. नव्याने नियुक्त झालेल्या तांत्रिक कामगारांना अतिरिक्त दोन वार्षिक वाढ देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात येईल. अंतर्गत भरतीमध्ये कंपनीतील पदवी व पदविकाधारक कामगारांसाठी २५% जागा रिक्त ठेवण्यात याव्यात म्हणून टिप्पणी सादर करण्यात येईल. पदोन्नतीनंतरची दरी कमी करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी सांगितले.
लाइनस्टाफसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना
By admin | Published: August 04, 2015 1:32 AM