- मनोहर कुंभेजकर
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल -मे महिन्यात रक्ताचा तुटवडा भासतो.सुट्या असल्यामुळे एनजीओ आणि महाविद्यालयांमार्फत होणारी रक्तदान शिबिरांचे प्रमाण खूप कमी असते.
महाराष्ट्रात ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण वेळापत्रक आखून टप्याटप्याने झाल्यास काही प्रमाणात रक्ताची चणचण एप्रिल-मे महिन्यात भासणार नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील रक्तदानाचे कार्यक्रम घेणाऱ्या संस्थांशी तसेच महाराष्ट्र रक्त संकलन परिषदेशी संपर्क साधून भविष्यातील रक्ताच्या चणचणीवर मात करता येईल.
तसेच लसीकरणा अगोदर सदर ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे, अशी विनंती राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून असे आवाहन जनतेला करणे योग्य राहील यावर विचार करावा अशी विनंती देखिल त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात एकूण 345 रक्त संकलन केंद्र असून मुंबईत 58 आहेत. तर आपल्याकडे सुमारे 10000 ऐच्छिक रक्तदाते आहेत.महाराष्ट्रासाठी मासिक 1 ते 1.5 लाख युनिट्स व मुंबईसाठी मासिक 18000 ते 30000 युनिट्स रक्ताची गरज आहे. त्यामुळे लसीकरणाआधी एप्रिल -मे महिन्यात आगोदर रक्तदान शिबिरे घेणे योग्य राहील अशी विनंती डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
आता कोविड प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ऐच्छिक रक्तदाते सुद्धा लसीकरणासाठी जाण्याची शक्यता आहे. दोन लसीकरणाचा कालावधी हा 6 ते 8 आठवडे असल्याने त्यांना पुढील 80 ते 100 दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यानंतर त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होण्याचा कालावधी आणि अँटीबॉडीजचे प्रमाण हे सर्व लक्षात घेतल्यास आणि ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण झाल्यास त्यांचा रक्तदाते म्हणून उपयोग होणार नाही असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.