मुंबई : महापालिका निवडणुकीत वेगवेगळ््या पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांमुळे संभ्रमात पडलेल्या मतदारांनी पक्षांकडे पाहाण्याऐवजी चारित्र्यवान आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांनाच मत देत मुंबईच्या विकासाला गती द्यावी, असे आवाहन जन मुक्ती मोर्चा या स्वयंसेवी संघटनेने तब्बल दोन लाख पत्रके वाटून केले आहे.जन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मानव जोशी आणि सचिव रितू जोशी यांनी जनहितार्थ प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अनेक मुद्यांचा मतदारांची विचार करावा, असे नमूद केले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. जात, धर्म व अल्पकालीन भावनिक विषयांकडे दुर्लक्ष करा. सध्याच्या स्थितीमध्ये लोकोपयोगी योजना आणि विकासाला गती देणाऱ्या व नियोजनबद्ध कार्यक्रम राबवणाऱ्या प्रतिनिधीलाच आपले मत द्या. विकासाची साधने प्रभावीपणे राबवण्याची क्षमता आणि दृष्टीकोन कोणत्या उमेदवारामध्ये आहे याचे अवलोकन मतदारांनी करणे आवश्यक असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. शिक्षण, व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान, रस्ते विकास, शेती व्यवसायाचा दर्जा, नैसर्गिक साधनांचे योग्य नियोजन, संरक्षण, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, कामाचा योग्य मोबदला व महिला आणि बाल कल्याणाला प्राधान्य, गलिच्छ वस्तीत अत्यावश्यक सुविधांबाबत ज्या पक्षाने प्रत्यक्षात काम केले आहे व यापुढेही ते नि:ष्पक्षपातीपणे चालू ठेवण्याचा ज्यांचा निर्धार आहे अशाच पक्षाच्या उमेदवाराचा मतदान करताना विचार करा. मुंबईकरांना बारा तास पाणी मिळावे यासाठी जो उमेदवार आग्रही आहे आणि जो पक्ष पावसाचे पाणी मुबलक प्रमाणात पुढील दोन वर्र्षाकरीता मुंबईकरांसाठी साठवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील अथवा सक्षम आहे अशांनाच मत द्या, असे आवाहन यात करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘स्वच्छ आणि चारित्र्यवान उमेदवारालाच मत द्या’
By admin | Published: February 10, 2017 4:45 AM