पर्यावरणाचे काम करणाऱ्यांनाच मत; नवमतदारांनी नोंदविला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:03 AM2024-03-26T10:03:55+5:302024-03-26T10:07:48+5:30
सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
मुंबई : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यावेळी पहिल्यांदाच मतदान करणारे नवमतदार कोणाला संधी देणार, याबद्दल सर्वेक्षण घेण्यात आले. क्लायमेट एज्युकेशन नेटवर्क, असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स आणि सीएमएसआर कन्सल्टंट्स यांनी जानेवारीत हे सर्वेक्षण केले. वातावरण बदलासाठी काम करणाऱ्यांना मत देण्याकडे नवमतदारांचा कल असल्याचे या सर्वेक्षणामधून समोर आले आहे. वातावरण शिक्षणाबाबत नवमतदारांचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी मुंबई आणि पुणे या दोन शहरांत हे सर्वेक्षण करण्यात आले.
भारतातील वातावरण शिक्षणाबाबत नवमतदारांचा दृष्टिकोन हे सर्वेक्षण जानेवारीमध्ये करण्यात आले. क्लायमेट एज्युकेशन नेटवर्क, असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स आणि सीएमएसआर कन्सल्टंट्स यांनी महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांमधील सात शहरांमध्ये १,६०० नवमतदारांमध्ये हे प्राथमिक सर्वेक्षण केले. मुंबई आणि पुणे येथील ४०० नवमतदारांनी या सर्वेक्षणात वातावरण शिक्षणाबाबत आपली मते नोंदविली आहेत.
वातावरण बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी वातावरण शिक्षण हे सरकारी धोरण असायला हवे, असे मत ५२.२ टक्के जणांनी मांडले आहे. वातावरण बदलाबाबत ३० टक्के जणांनी निराशा, २९ टक्के जणांनी भीती, ११ टक्के नवमतदारांनी राग, तर १० टक्के जणांनी चिंता व्यक्त केली, तर केवळ २० टक्के इतक्या कमी नवमतदारांनी आशावादी प्रतिसाद दिला.
१) ८१ टक्के जणांनी वातावरणीय संकटांचा सामना करणे ही संयुक्त जागतिक जबाबदारी असल्याचे मान्य केले.
२) बहुसंख्य लोकांनी (२६ टक्के) उद्योगांना वातावरणीय संकटासाठी जबाबदार असल्याचे नमूद केले.
३) २५ टक्के जणांनी वैयक्तिक नागरिकांना आणि १८ टक्के लोकांनी राज्य सरकारला जबाबदार धरले.
४) वातावरणीय संकटाबाबत सरकार पुरेसे काम करत असल्याचे ८३ टक्के जणांना वाटते.
वातावरणाबाबतच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या जीवनातील वास्तवाशी जोडण्यासाठी स्थानिक संदर्भ व विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार वातावरण शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करणे महत्त्वाचे आहे. - विनुता गोपाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, असर.
शिफारशी काय आहेत?
१) विद्यार्थी इयत्तांमध्ये पुढे जाईल, तसे वातावरण बदल विषयांची व्याप्ती वाढविणे.
२) प्रयोग, फिल्ड ट्रिप्स आणि केस स्टडीज यांच्यासारख्या संवादात्मक पद्धतींद्वारे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे.
३) शाळा, माध्यमे, सामाजिक उपक्रमांसह, माध्यमांद्वारे वातावरण बदलाबाबत जागरूकता वाढविणे.