मतदार याद्या अखेर जाहीर

By admin | Published: March 18, 2015 01:13 AM2015-03-18T01:13:50+5:302015-03-18T01:13:50+5:30

पालिका निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू झाला असून मंगळवारी पालिका हद्दीतील मतदार याद्या प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या.

Voter lists are finally announced | मतदार याद्या अखेर जाहीर

मतदार याद्या अखेर जाहीर

Next

नवी मुंबई : पालिका निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू झाला असून मंगळवारी पालिका हद्दीतील मतदार याद्या प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या.
प्रशासकीय दिरंगाईमुळे निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी मंगळवारी उशिरा जाहीर करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांना दिवसभरात यादी पाहता आली नाही. तर पालिकेच्या संकेतस्थळावरही रात्री उशिरापर्यंत यादी न टाकल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी मंगळवारी प्रकाशित करण्यात येणार होती. परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत याद्या तपासण्याचे काम पूर्ण झाले नव्हते. यामुळे निवडणूक उपआयुक्त अमरिष पटनिगिरे, सर्व विभाग अधिकारी व निवडणूक विभागातील कर्मचारी दिवसभर याद्या तयार करत होते. पूर्ण रात्रभर हे काम सुरू होते. मंगळवारी दुपारपर्यंत याविषयीचे काम सुरूच होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत याद्या विभाग कार्यालय व पालिका मुख्यालयाच्या फलकावर लावण्यात आल्या नव्हत्या. इच्छुक उमेदवारांनी ११ वाजल्यापासून याद्या मिळाव्या यासाठी कार्यालय गाठले होते परंतु त्यांना सायंकाळपर्यंत त्या उपलब्ध झाल्या नाहीत. अखेर सायंकाळी विभाग कार्यालयांना याद्या पाठविण्यात आल्या. वेळेवर हे काम झाले नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा एक दिवस फुकट गेला. बुधवारी यादी उपलब्ध होणार असून, याद्या पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेच्या संकेतस्थळावरही रात्री उशिरापर्यंत यादी उपलब्ध झाली नव्हती.
निवडणूक विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रभागनिहाय यादी तयार करताना तारेवरची कसरत करावी लागली. चुका राहू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत होती. पालिकेचे अधिकारी सोमवारी पूर्ण रात्रभर काम करत होते. मंगळवारीही ४ वाजेपर्यंत काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी याद्या प्रसिद्ध केल्या. त्या बुधवारपासून उपलब्ध केल्या जाणार आहेत. मतदार यादी पाहण्यासाठीचा एक दिवस व्यर्थ गेल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

मंगळवारी उशिरा यादी प्रसिद्ध करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पालिकेच्या संकेतस्थळावरही मतदार याद्या टाकण्यात आल्या नव्हत्या. या दिरंगाईविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून पालिका प्रशासनाने संकेतस्थळावर सर्व बाबी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

हरकतीसाठी सोमवारपर्यंत मुदत
मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्यास नागरिकांना २३ मार्चपर्यंत सूचना व हरकतींसाठी मुदत देण्यात आली आहे. नागरिकांना मंगळवारी यादी मिळाली असती तर त्याची पाहणी करून तत्काळ हरकती कळविणे सोपे झाले असते. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे एक दिवस फुकट गेला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परंतु सोमवारपर्यंत पालिका मुख्यालय, सीबीडी विभाग कार्यालयांमध्ये अंतिम आराखडा व प्रभागाच्या रचनेची पुस्तिका उपलब्ध झाली नव्हती.

Web Title: Voter lists are finally announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.