मुंबई : निवडणूक प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. मतदार राजाला खूश करण्यासाठी ए वॉर्डमधील ‘नोफ्रा’ परिसरात मतदारांना पैसेवाटप करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. पैसेवाटप होण्याचा प्रकार घडल्याचे काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊन निवडणूक आयोगाला माहिती दिली. पोलीस आणि निवडणूक आयोग या प्रकरणाची पुढे चौकशी करत आहे. शनिवार, १८ फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास ए वॉर्डच्या नियंत्रण कक्षाकडून भरारी पथकाला माहिती प्राप्त झाली. या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २२७मधील मकरंद नार्वेकर यांचे कार्यकर्ते लोकांना पैसे वाटत असल्याची तक्रार करण्यात आली. पैसे वाटत असणाऱ्या लोकांना पकडल्याची तक्रार मयूर कोकम यांनी नोंदविली. माहिती मिळताच ९ वाजून ५ मिनिटांनी नोफ्रा परिरसराच्या प्रवेशद्वाराजवळ भरारी पथक पोहोचले. पण, हा परिसर प्रतिबंधक असल्याने आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. अरविंद राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. तर, अरविंद नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार, नोफ्रा हा प्रतिबंधित भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांनादेखील प्रचार करण्यास आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तिथे कार्यकर्ते कसे जातील? या भागात कसे पैसेवाटप करणार? कोणताही उमेदवार आतापर्यंत प्रचारासाठी आत गेलेला नाही. त्यामुळे हे शक्यच नाही, असा प्रतिवादही करण्यात आला. (प्रतिनिधी)
मतदारांना पैसेवाटप?
By admin | Published: February 20, 2017 7:04 AM