सचिन लुंगसे, मुंबई : लोकसभा निवडणुकीचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदानाबाबत पुरेपूर जनजागृती होत असतानाच, मुंबईकरांनी निवडणुकीच्या हंगामात गावाकडे जाण्याचे बेत आखले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईतून राज्यासह राज्याबाहेर जाणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस ९० टक्क्यांहून अधिक फुल्ल झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे २० मे रोजी मुंबई शहर आणि उपनगरात होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी खाली येण्याची शक्यता आहे.
राज्यात एकूण ५ टप्प्यांतील लोकसभेचे मतदान मुंबई व ठाण्यात २० मे रोजी होणार आहे. सोशल मीडियासह सोसायटी आणि मुंबईच्या गल्लोगल्ली मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, निवडणूक काळात बहुतांशी मुंबईकर गावी जाणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्यासह राजकीय पक्षांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे काय म्हणते?
१) उत्तर आणि उत्तर पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे बुकिंग हे १०० टक्क्यांवर जाते. कारण, या रेल्वेगाड्यांचे बुकिंग उशिरा केले तर जागा मिळत नाही. त्यामुळे या सर्व रेल्वेगाड्या फुल्ल होण्याच्या मार्गावर असून, त्यांचे तिकीट वेटिंगवर येते.
२) अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग हे पंधरा दिवस अगोदर केले जाते. कारण, या जवळच्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या आहेत. त्यामुळे त्याचे तिकीट पंधरा दिवस अगोदर मिळते. त्यामुळे या गाड्या अद्याप १०० टक्के फुल्ल झालेल्या नाहीत.
उत्तर भारतीय मतदान -
१) मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय आहेत. काहींचे मतदान परराज्यात, तर काहींचे मुंबईत आहे. उत्तर भारतीयांना मतदानासाठी मुंबईत थांबविणे हे राजकीय पक्षांसमोर आव्हान असणार आहे.
इलेक्शन ड्युटी -
१) मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदानासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून प्रशासनाने प्रत्येक प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी लावली आहे. यातील कर्मचारी हे शिक्षकही आहेत.
कोणता नवा फंडा?
गेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान कोकणातील ज्येष्ठ नागरिकांनी मुंबईत दाखल होत मतदान केले होते. मतदानाची टक्केवारी वाढावी यापेक्षाही आपापल्या पक्षाला मतदान व्हावे, म्हणून काही राजकीय पक्षांनी मुंबईकरांना मतदान करून गावी जाण्याचे आवाहन केले होते. या लोकसभेवेळी राजकीय पक्ष कोणता फंडा वापरतात ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्य रेल्वे काय म्हणते?
१) मुंबईहून विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि कोकणासह राज्याबाहेर जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण हे ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे.
२) काही गाड्यांमधील एसीकोचमध्ये काही जागा शिल्लक असतील. मात्र, त्याही बुक होण्याच्या मार्गावर आहेत.
३) वंदे भारतच्या काही गाड्यांचे बुकिंग होणे बाकी असले, तरी त्या गाड्याही हाऊसफुल्ल होत आहे.
४) तिकिटांचा काळाबाजार अथवा तिकिटांची अवैध विक्री होऊ नये म्हणून दलालांना थोपविण्यासाठी कारवाई सुरू आहे.
५) रेल्वेगाड्यांच्या आरक्षणात मिनिटागणिक बदल होत असतात. वेटिंगचे आकडे पुढे सरकत आहेत.
६) ज्या गाड्यांचे रेल्वे बुकिंग ७५ टक्क्यांच्या आसपास आहे, तेदेखील काही दिवसांत ९० टक्क्यांच्या आसपास जाईल.