वांद्रेत तणावपूर्ण वातावरणात मतदान

By admin | Published: April 12, 2015 02:08 AM2015-04-12T02:08:53+5:302015-04-12T02:08:53+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शनिवारी सरासरी ४२ टक्के मतदान झाले

Voter in Vandrett's tense environment | वांद्रेत तणावपूर्ण वातावरणात मतदान

वांद्रेत तणावपूर्ण वातावरणात मतदान

Next

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शनिवारी सरासरी ४२ टक्के मतदान झाले. बहुतांश मतदान केंद्रांवर सेना व काँग्रेस उमेदवाराचे समर्थक मोठ्या संख्येने थांबून राहिल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी पुरेशी खबरदारी घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान सुरळीत पार पडले.
पाच महिन्यांपूर्वी येथे झालेल्या निवडणुकीत ४७.१ टक्के मतदान झाले होते. त्यात जवळपास ५ टक्क्यांनी घट झाली. गेल्या निवडणुकीत येथे कॉँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. मात्र या वेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादी व समाजवादी पार्टी अशी मोट बांधत राणे यांनी पद्धतशीर प्रचार यंत्रणा राबविल्याने शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे केले. मतदान केंद्रावरही चुरस दिसून येत होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य ठाकरे यांनी गांधी नगरमधील मतदान केंद्रात मतदान केले. त्याअगोदर महायुतीचे घटक असलेल्या रिपाइंचे खा. रामदास आठवले यांनी मतदान केले.
स्थानबद्धतेमुळे तणावात वाढ
नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश आणि आमदार नितेश राणे यांना शनिवारी मतदानादरम्यान खेरवाडी व वाकोला पोलिसांनी काही तासांसाठी स्थानबद्ध केल्याने तणाव निर्माण झाला होता.
नारायण राणे यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अकराच्या सुमारास खेरवाडी पोलीस ठाणे गाठले. तेथे उपायुक्त सत्यनारायण चौधरी, खेरवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांनी नीलेश यांना आचारसंहितेमुळे तत्काळ बाहेर सोडण्यास असमर्थता दर्शविली. त्यावर आक्षेप घेत राणे यांनी शिवसेना सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला. (प्रतिनिधी)

Web Title: Voter in Vandrett's tense environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.