मुंबईः ईव्हीएमद्वारे निवडणुकीला विरोध करण्यासाठी राज्यातल्या सर्व विरोध पक्षांचे नेते एकत्र आले असून, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. वांद्र्यातल्या एमआयजीमध्ये सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.अजित पवार म्हणाले, ज्यांनी मतदान केलेलं आहे, त्यालाही आपण त्याच उमेदवार आणि चिन्हाला मतदान केलं आहे का हे समजलं पाहिजे. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशिनवरही अनेक प्रकारच्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. भाजपातले सत्ताधारीही एवढ्या जागा येतील आणि तेवढ्याच जागा निवडून असा अंदाज व्यक्त करतात. तशाच प्रकारे त्यांच्या जागा निवडून येत आहेत. लोकशाहीत असं घडता कामा नये, लोकशाहीत जनतेनं बहुमतानं एखाद्या नेत्याला नक्कीच निवडून द्यावं, पण एकंदरीतच ईव्हीएमबाबत अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. देशातल्या विरोधकांसह काही एनजीओंमध्येही संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.अनेक मान्यवरांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केलेली आहे. त्यामुळे यावेळी निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. इंदिरा गांधींनाही त्यावेळी जनतेनं निवडून दिलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यास प्राधान्य द्यावं. माझ्या कुटुंबात सात मतं होती, फक्त पाचच पडली, अशीही शक्यता काहींनी व्यक्त केली होती. ही जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी, जनतेनं प्रतिसाद दिल्यास निवडणूक आयोग वेगळा विचार करू शकतो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
मतदान कोणाला केलं याबाबत मतदारही संभ्रमात; ईव्हीएम नकोच- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 11:47 AM