मतदारांना मतदान केंद्रात मोबाईलसह गॅजेट्स वापरण्यास बंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 09:10 PM2019-03-25T21:10:23+5:302019-03-25T21:10:25+5:30
निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती : जप्तीची कारवाई करणार
- चेतन ननावरे
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी होणाºया मतदान केंद्रावर मतदार किंवा कोणत्याही व्यक्तीमार्फत मोबाईल किंवा कोणतेही गॅजेट्स वापरताना दिसल्यास ते जप्त केले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी संबंधित मतदान केंद्राध्यक्षांंमार्फत ही कारवाई होणे अपेक्षित असल्याचे निवडणूक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोबाईसह विविध गॅजेट्सअभावी मतदानादिवशी मतदारांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी या माहितीवर शिक्कामोर्तब केले आहे. मोहोड यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने आखलेल्या नियमावलीनुसार मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल किंवा कोणत्याही प्रकारचे गॅजेट्स वापरता येणार नाही. परिणामी, मतदारांनी मतदानास येताना किंवा मतदान केंद्रांबाहेरच मोबाईल किंवा अन्य गॅजेट्स ठेवणे अपेक्षित आहे. नाहीतर संबंधित मतदान केंद्राध्यक्षाकडून तो जप्त करण्याची कारवाई केली जाईल.
दरम्यान, मतदान केंद्रावर मोबाईल किंवा गॅजेट्स ठेवण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसेल, असे निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याउलट बहुतेक मतदार हे कामावर जाताना किंवा कार्यालयातून येताना मतदान करताना दिसतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह चाकरमानी मतदार मोठ्या संख्येने प्रवासादरम्यान मोबाईल, लॅपटॉप, टॅब असे विविध गॅजेट्स वापरतात. त्यामुळे मतदान करून पुन्हा गॅजेट्स घेण्यासाठी घरी जाणे वेळखाऊपणाचे असल्याचे मत मतदारांमधून व्यक्त होत आहे. तसेच निवडणूक आयोगाने या नियमात शिथिलता आणावी किंवा मतदान केंद्राबाहेर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ठेवण्याची व्यवस्था उभारावी, अशी मागणी पुढे आली आहे.
नियमाकडे कानाडोळा होणार!
या नियमासंदर्भात बहुतेक अधिकाºयांकडून कानाडोळा होण्याची शक्यता निवडणूक अधिकारी कार्यालयातील एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. या नियमाचे तंतोतंत पालन केल्यास मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच मतदारांकडून मतदान करण्याबाबत पाठ फिरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानावर विपरित परिणाम होऊ नये, म्हणून मतदान केंद्राध्यक्षांकडून या नियमाच्या अंमलबजावणीकडे पाठ फिरवण्याची दाट शक्यता असल्याचेही संबंधित अधिकाºयाने सांगितले.