Join us

मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर!

By संजय घावरे | Published: June 05, 2024 8:32 PM

गोविंदा, सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्रवीण तरडे, किरण माने, प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड यांनी केला होता प्रचार

मुंबई- मनोरंजन विश्वातील तारे-तारकांचा प्रचार सभा आणि रोड शोजना ग्लॅमर टच देत गर्दी खेचण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये वाढला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मात्र अत्यंत कमी कलाकारांनी प्रचाराच्या सुपाऱ्या फोडल्याने ही निवडणूक मात्र याला अपवाद ठरली आहे. कलाकारांच्या ग्लॅमरला न भुलता मतदाराराजाने कार्यसम्राट उमेदवाराच्याच गळ्यात विजयाची माळ घातल्याचे निकालानंतर पाहायला मिळत आहे.

चंद्रपूरमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदी-मराठीतील कलाकारांना प्रचाराच्या रॅलीत उतरवून ग्लॅमर टच दिला होता. कलाकारांनीही उन्हाची पर्वा न करता प्रचार केला आणि त्यांना पाहण्यासाठी कडक उन्हात सर्वसामान्यांनीही गर्दी केली होती, पण त्याचे विजयात रूपांतर झाले नाही. मुनगंटीवार यांच्यासाठी सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड चंद्रपूरमध्ये प्रचार केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वनी विधानसभा मतदारसंघात रवीनाने प्रचार केला. सुनील शेट्टीने भद्रावती आणि वरोरमध्ये मतदारांचे लक्ष वेधले होते. प्राजक्ता माळीने वनी-आर्मी भागात, तर निशीगंधा वाड यांनी मूल व पोंभूणा भागात मतदात्यांना आवाहन केले, पण मतदारांनी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांच्या खांद्यावर विजयाची पताका दिली. त्यामुळे चंद्रपूरमध्ये 'सेलिब्रिटी फॅक्टर' उपयोगी पडलेला नाही. 

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे मैत्रीला जागत पुण्यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी उतरला होता. मोहोळ यांच्या कार्याची माहिती देत प्रवीणने आपल्या अनोख्या शैलीत त्यांच्यासाठी मते मागितली होती. याखेरीज 'शहरभर मुरलीधर' ही प्रवीणची दोन शब्दांची पोस्टही सोशल मीडियावर गाजली होती. मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांना मात देत विजय मिळवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराजांची नावे घेत किरण माने यांनी ठाण्यामध्ये महाविकास आघाडीचे राजन विचारे यांच्या प्रचारासाठी राम गणेश गडकरी चौकात आपल्या बेधडक शैलीत भाषण केले होते. यासोबतच विरोधकांवर टीकेची झोड उठवत विषारी सापांचा डाग पुसण्याचे आवाहन मतदारांना केले होते, पण काहीच फायदा झाला नाही. विचारेंच्या विरोधातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नरेश म्हस्के विजयी झाले. साताऱ्यामध्ये किरण मानेंनी महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे यांना पाठिंबा दर्शवत भाजपाच्या उदयनराजे भोसलेंना विरोध केला होता. 'छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही', अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती, पण साताऱ्यात शिंदेंची पिछेहाट आणि भोसलेंची सरशी झाली. आता मानेंनी सोशल मीडियाद्वारे भोसलेंचे अभिनंदन केले आहे.

काँग्रेसचा माजी खासदार असलेला गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून वायव्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण तसे काही झाले नाही. त्यामुळे निवडणूकीच्या रिंगणात न उतरलेल्या गोविंदाने मावळ लोकसभा महायुतीचे श्रीरंग बारणे यांचा प्रचार केला. पिंपरी चौकातून निघालेल्या बाईक रॅलीत गोविंदा सहभागी झाला होता. गोविंदाला पाहण्यासाठी खूप गर्दीही झाली होती. यावेळी पत्रकार परिषदेत बारणे यांचे नाव विसरल्याने केवळ 'आदरणीय' असे म्हटल्याने गोविंदा ट्रोल झाला होता. या निवडणूकीत संजय वाघेरे यांचा पराभव करत श्रीरंग बारणे दीड लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे या निवडणूकीत काही ठिकाणी 'सेलिब्रिटी फॅक्टर' कामी आला आहे, तर काही ठिकाणी फेल गेला आहे.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबईभाजपाशिवसेना