मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत राजकीय पक्षांच्या आरोप - प्रत्यारोपांच्या पोस्टस्चे जोरदार वादळ उठले होते. मात्र, जाहीर प्रचार थांबल्यावर सोशल मीडियावरही बंधने आली, परंतु प्रचार बंद झाल्यानंतर रविवारी सायंकाळपासून फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉटस्अॅप या माध्यमांवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या पोस्टस्ना उधाण आले आहे.‘आपले मत काळजीपूर्वक नोंदविले, तरच येतील चांगली माणसे राजकारणात’, ‘मतदान करणे एवढेच ज्यांना पुरेसे वाटत नाही, त्यांच्यासाठी भरमसाठ सवलतीही आहेत’, ‘सलमानचा एक सिनेमा फ्लॉप झाला, तरी त्याच्याकडे पुढचे काही महिने पुन्हा असतात नवा सिनेमा तयार करण्यासाठी. मात्र, आपण एकदा चुकीचा उमेदवार निवडला, तर ती चूक पाच वर्षे झेलायला लागेल, त्यामुळे विचार करून मत द्या’, ‘कोणत्याही प्रलोभनांना भुलून न जाता मतदान करा’ अशा विविध संदेशांची लाट सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे. त्याचप्रमाणे, मुंबई शहर-उपनगरातील महाविद्यालयीन तरुणाईनेही आपापल्या ग्रुप्समध्ये ‘सोशल’ व्यासपीठांवर नवमतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय, छोट्या-छोट्या व्हिडीओंमधून आपले कर्तव्य, जबाबदारी बजावण्याविषयी मुंबईकर मतदारांना जाणीव करून दिली. (प्रतिनिधी)
मतदारांना जागृत करणाऱ्या पोस्टस्ना आले उधाण
By admin | Published: February 21, 2017 6:41 AM