मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 01:47 PM2024-11-17T13:47:49+5:302024-11-17T13:49:11+5:30
सुरेश ठमके मुंबई : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे समोर आले. यातील अनेक ...
सुरेश ठमके
मुंबई : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे समोर आले. यातील अनेक बंडोबांना थंड करण्यात वरिष्ठ नेते यशस्वी झाले असून, काहींना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला. त्यानंतरही रिंगणात राहिलेल्या अनेक बंडखोर अपक्षांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ आणल्याचे चित्र दिसते आहे. मात्र, आतापर्यंतच्या निवडणूक निकालांवरून स्पष्ट होते की मुंबईत अपक्षांना मतदारांनी कधीच थारा दिलेला नाही. तसाच यावेळीदेखील मिळणार नाही, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारी देताना अनेक कसरती कराव्या लागतात. जास्तीत जास्त कार्यकर्ते पक्षासोबत राहतील आणि नाराजांची अथवा बंडखोरांची संख्या वाढणार नाही, याकडे पक्षश्रेष्ठींना लक्ष द्यावे लागते. मात्र, तरीही प्रत्येक निवडणुकीत अनेक नाराज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवितात. मात्र,
मुंबईमध्ये आजवर अपक्षांचा फारसा टिकाव लागलेला नसल्याचे दिसून आले आहे.
राज्यात मिळते पसंती
राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये अशा दमदार अपक्ष उमेदवारांना कित्येकदा मतदारांची पसंती मिळते आणि ते निवडूनही येतात. मात्र, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये अशा अपक्ष उमेदवारांना फारशी मतदारांची सहानुभूती मिळविता आलेली नाही, असे चित्र आहे.
छोटे पक्षही बेदखल
- मतदारांनी केवळ अपक्षांनाच नव्हे, तर छोट्या पक्षांनाही बेदखल केल्याचे विधानसभा निवडणूक निकालांवरून दिसते.
-२०१४ मध्ये मनसे, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना एकही जागा मुंबईत जिंकता आली नाही.
-२०१९ मध्येदेखील मनसे आणि बसपाची स्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
कोण आहेत आव्हानात्मक अपक्ष उमेदवार?
-मुंबईतील सर्व मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्यांमध्येच थेट लढत होईल, अशी शक्यता आहे. मात्र, काही प्रमाणात प्रभाव टाकू शकणाऱ्या अपक्ष उमेदवारांमध्ये वर्सोवा मतदारसंघातील उद्धव सेनेतील बंडखोर राजू पेडणेकर आणि शिवडी मतदारसंघात भाजपचे नाराज नेते नाना आंबोले यांचा समावेश आहे.
-मुंबईत यापूर्वीप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मतदार अपक्षांच्या पारड्यात मतदान टाकणार नाहीत, अशीच शक्यता वर्तविण्यात येत आहे.