आज मतदारच ‘राजा’!
By admin | Published: April 22, 2015 03:30 AM2015-04-22T03:30:52+5:302015-04-22T03:30:52+5:30
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. १११ प्रभागातील ७७४ केंद्रांवर मतदान होणार असून, ५६८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. १११ प्रभागातील ७७४ केंद्रांवर मतदान होणार असून, ५६८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. मतदानासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी राजीव गांधी मैदानामध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना मतपेट्यांचे वितरण करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरात ३२ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवरील मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. पोलिसांना आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा पोहचल्या का त्याचा आढावा घेतला आहे.
मतदान शांततेमध्ये व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. उमेदवारही मतदान केंद्रावर जाऊन पाहणी करतानाचे चित्र दिसत होते. करावे गाव परिसरातील केंद्रांविषयी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने यापूर्वीच आक्षेप नोंदविला होता. तुर्भे गणेशनगरमधील मतदारांनाही इंदिरानगर शाळेत जावे लागणार असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दिवसभर सर्वच उमेदवारांनी प्रभागांमध्ये पहारा सुरू केला होता. प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून पैसे वाटप होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते दक्ष होते. सोशल मीडियावर पैसे व दारू वाटपाची चर्चा दिवसभर सुरू होती.