Join us

मतदार यादी मेंटेनन्सच्या नावे बंद

By admin | Published: March 16, 2015 1:52 AM

राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांचे काम आॅनलाइन करण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे. मात्र, ही यंत्रणा पूर्णत: अपयशी ठ

पंकज पाटील, अंबरनाथ राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांचे काम आॅनलाइन करण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे. मात्र, ही यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरत असली तरी निवडणूक आयोग मतदारांना कोणताही दुसरा पर्याय देत नाही. त्यामुळे हरकती घेणारे मतदार आता महाआॅनलाइनच्या वेबसाइटवरच अवलंबून राहिले आहेत. मात्र, रविवारी दिवसभर कामाच्या वेळेस या आॅनलाइन मतदार याद्या मेंटेनन्सच्या नावाने बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात संताप वाढत आहे. एप्रिल महिन्यात अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व मतदार याद्या महाआॅनलाइन कंपनीच्या माध्यमातून आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. ज्या मतदारांची नावे यादीत नाहीत किंवा ज्या मतदारांचे प्रभाग बदलले आहेत, त्या मतदारांनी हरकती घेण्याची यंत्रणा याच वेबसाइटचा वापर सुरू केला आहे. आॅनलाइन प्रक्रिया समजण्यास मतदारांना विलंब लागत आहे. ९ मार्च रोजी यादी प्रसिद्ध झाली असली तरी १० मार्चला दुपारनंतर याद्या मतदारांना मिळाल्या आहेत. त्यातही या यादीमध्ये अनेक मतदारांची नावे नसल्याने हे मतदार आॅनलाइन वेबसाइटवर आपले नाव शोधत आहेत. शोधलेले नाव कोणत्या प्रभागात आहे, हे समजल्यावर योग्य त्या हरकती घेऊन मतदार आपले नाव राहत असलेल्या प्रभागात टाकत आहे. रविवारची सुटी असल्याने अनेक मतदारांनी आपल्या हरकती घेण्यासाठी आज वेबसाइट उघडली असता नाव शोधण्याची यंत्रणा बंद ठेवण्यात आल्याचे दिसले. नाव शोधण्याची यंत्रणाच कार्यान्वित होत नसल्याने मतदारांचा संपूर्ण दिवस वाया गेला आहे. वेबसाइट मेंटेनन्सच्या नावाने बंद ठेवल्याने मतदारांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीपासून मतदार यादीचा घोळ सुरू असून हा घोळ सुटता सुटत नसल्याचे चित्र दिसत आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकतीसाठी १७ मार्चचा दिवस शेवटचा ठेवण्यात आला आहे. हरकतीसाठी दिवस कमी असताना वेबसाइट बंद ठेवण्यात येत असल्याने मतदारांमध्ये आणि इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी नाराजी आहे. सुरुवातीच्या दिवशी वेबसाइट संथगतीने कशीबशी सुरू होती. आणि आता तर बंदच ठेवली आहे.