Join us  

नेव्ही नगरातले मतदार झोपलेलेच!

By admin | Published: February 23, 2017 6:44 AM

मुंबईत सर्वत्र मतदानाचा टक्का वाढला असला तरीही मुंबईतील शेवटच्या प्रभागातील मतदारांच्या

मुंबई : मुंबईत सर्वत्र मतदानाचा टक्का वाढला असला तरीही मुंबईतील शेवटच्या प्रभागातील मतदारांच्या निरुत्साहामुळे मतदान टक्केवारीत ही शेवटचा नंबर लागला आहे. मुंबईतील मतदानाचा टक्का ५५ वर गेला असताना नेव्हीनगर, गीतानगर आणि गणाचार्य चौकातील मतदारांनी मात्र मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नेव्हीनगरच्या परिसरात दर तीन वर्षांनी मतदार बदलत असतात. कारण, या राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्यामुळे नेहमीच येथे नवीन मतदार येत असतात. अनेक जण मतदानाच्यावेळी मुंबईत नसतात. त्यामुळे या परिसरातील मतदानाचा टक्का हा कमी असतो. पण, याच ुप्रभागात गीतानगर हा झोपडपट्टीचा भाग आहे. या भागातून मतदानाचा टक्का अधिक असतो. त्यामुळे अनेक उमेदवार हे याच ठिकाणी प्रचाराला महत्त्व देतात. या प्रभागात कुलाबा कॉजवे आणि बाजूचा परिसर येतो. या परिसरात रहिवासी क्षेत्र कमी असून व्यावसायिक क्षेत्र अधिक आहे. व्यावसायिक अधिक असल्यामुळेही येथील मतदानाचा टक्का कमी असतो. पण, या वर्षी टक्का जास्तच घसरला आहे. या प्रभागाची लोकसंख्या ही ६० हजार ६९५ इतकी आहे. या प्रभागातील मतदारांची संख्या ५० हजारच्या आसपास असली तरीही फक्त १२ हजार ४९८ जणांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे आता नक्की कोणत्या पक्षाकडे कल असेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)निवडणूक आयोगाचे अपयश : मुंबईच्या टोकाला असलेल्या या शेवटच्या प्रभागात गीतानगर, अफगाण चर्च आणि नेव्हीनगर ही प्रमुख ठिकाणे आहेत. ६० हजार ६९५ इतकी लोकसंख्या असलेल्या या प्रभागात अनुसूचित जातीची २,६५६ तर अनुसूचित जमातीची २२८ मतदार आहेत. तर झोपडपट्टीबहूल भागात मतदानाबाबत जनजागृती करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरल्याने कमी मतदानाची नामुष्की ओढावल्याची चर्चा आहे.