Join us

सुट्टीत मतदार गेले गावी; उमेदवार आले टेन्शनमध्ये...

By सचिन लुंगसे | Published: May 13, 2024 10:18 AM

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे सुट्टीसाठी गेलेल्या मतदारराजामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सचिन लुंगसे, वरिष्ठ प्रतिनिधी

मुंबईकरांची मते आपल्या पारड्यात पडावी यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जिवाचे रान केले असतानाच दुसरीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे गेलेल्या आणि जाणाऱ्या मतदारराजामुळे त्यांना धडकी भरली आहे. विशेषत: उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर गावाकडची वाट धरली असून, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचीही संख्या मोठी आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे सुट्टीसाठी गेलेल्या मतदारराजामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने एप्रिल महिन्यापासूनच उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त मेल/एक्स्प्रेस सोडल्या आहेत. मे महिन्यात यात रेल्वे गाड्यांचा भरणा होतच आहे. वाराणसीपासून दानापूरपर्यंतच्या आणि गुजरातसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्या एप्रिलपासूनच हाऊसफुल्ल झाल्या आहेत. आता तर अतिरिक्त सोडण्यात आलेल्या गाड्यांतही पाय ठेवायला जागा नाही. शाळांचे निकाल लागल्यानंतर गावाकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, भरभरून वाहणाऱ्या रेल्वे परतीच्या प्रवासादरम्यान सुरुवातीला रिकाम्या आल्या आहेत. आता परतीच्या प्रवासातही गर्दी होत असली तरी हे प्रमाण कमी आहे.

मुंबई महानगर प्रदेशातून दररोज राज्यभरात १ हजार ५०० हून अधिक एसटी बस सोडल्या जात असून, एसटीचे आरक्षण फुल झाले आहे. कोकणाशिवाय कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे जाणाऱ्या नियमित एसटी हाऊसफुल आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर, बोरीवली नॅन्सी कॉलनी, खोपट, ठाणे या बसस्थानकांहून नियमित सुटणाऱ्या दीड हजार बसचे आरक्षण फुल आहे. हीच परिस्थिती खासगी बसची आहे. दामदुप्पट पैसे आकारत खासगी बसने प्रवास केला जात आहे.

एव्हाना मुंबई बऱ्यापैकी रिकामी होत असून आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना मुंबईचा उकाडा सहन होत नसल्याने त्यांनीही गावाकडची वाट धरली आहे. यात मतदारांची संख्या बऱ्यापैकी असून, २० मेपर्यंत त्यांच्या परतीची शक्यता नाही. त्यामुळे उमेदवारांना या मतदारांच्या मतांवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत. उन्हात उमेदवार प्रत्येक मतासाठी दारोदार फिरत असतानाच गावाकडे गेलेल्या मतदारांना परत आणणे किंवा गावी जाणाऱ्या मतदारांना किमान मतदानाच्या दिवसापर्यंत थांबविणे हे उमेदवारांच्या हातात नसले तरी त्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत कोकणवासीयांचा मोठा भरणा आहे. पश्चिम उपनगरांतील उमेदवारांची मदार उत्तर भारतीयांवर आहे. पूर्व उपनगरात अल्पसंख्याक उमेदवारांचा भरणा अधिक आहे. यातील बहुतांश मतदार उत्तर भारत, कोकण, देशावरचे आहेत.  

एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईतून राज्यात व राज्याबाहेर जाणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेसचे पूर्ण बुकिंग झालेले आहे. उत्तर आणि उत्तर पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे बुकिंग १०० टक्क्यांवर आहे. मध्य रेल्वेच्या रोज सीएसएमटी, एलटीटी आणि दादर येथून सुमारे १०० हून अधिक मेल आणि एक्स्प्रेस धावतात. पश्चिम रेल्वेच्या ९० गाड्या मुंबईतून रोज राज्यात आणि राज्याबाहेर जातात. १४, १८, २२ डब्यांच्या मेल आणि एक्स्प्रेस मधून दररोज हजारांहून अधिक प्रवासी जातात. 

मुंबई महानगर प्रदेशातून दररोज १ हजार ५०० हून अधिक बस सोडल्या जातात. याव्यतिरिक्त खासगी टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्ससुद्धा भरभरून जात आहेत. मुंबईतून सुमारे ७०० हून अधिक बस दररोज जातात.

 

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४