Join us  

चेंबूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सेनेच्या शाखाप्रमुखाची बंडखोरी

By admin | Published: January 10, 2016 1:53 AM

चेंबूर-बोरला प्रभाग क्रमांक १४७च्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) मतदान होणार आहे. या ठिकाणी एकूण ६ उमेदवाररिंगणात आहेत. यातील शिवसेनेचे उमेदवार अनिल पाटणकर

मुंबई : चेंबूर-बोरला प्रभाग क्रमांक १४७च्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) मतदान होणार आहे. या ठिकाणी एकूण ६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील शिवसेनेचे उमेदवार अनिल पाटणकर आणि काँगेसचे उमेदवार राजेंद्र नगराळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, शिवसेनेने इतर कार्यकर्त्यांना डावलून पाटणकर यांना पोटनिवडणुकीचे तिकीट दिल्याने नाराज कार्यकर्त्यांनी शाखाप्रमुख नागेश तिवटे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले आहे.अनेक वर्षांपासून चेंबूर-घाटला प्रभाग क्रमांक १४७ हा शिवसेनेकडे होता. मात्र गेल्या पालिका निवडणुकीत सेनेला मागे टाकत त्या वेळी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या अनिल पाटणकर यांनी बाजी मारली. नारायण राणे यांचे समर्थक मानले जाणारे पाटणकर यांचा राणेंसोबत वाद झाल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या ठिकाणी ही पोटनिवडणूक होत आहे.

मारहाणीचा आरोपशिवसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार नागेश तवटे यांना बुधवारी रात्री काही अज्ञात इसमांनी मारहाण केली. ही मारहाण शिवसेनेचे उमेदवार अनिल पाटणकर यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तवटे यांनी केला आहे. याबाबत गोवंडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांना अशा प्रकारे मारहाण झालीच नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही मारहाण मी केली नसून उलट मीच पोलिसांना या घटनेची कसून चौकशी करण्याचे पत्र दिल्याचे पाटणकर यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)