Join us

पारा वाढला, मतदानाचा तोराही वाढला..., उत्साह कायम; उन्हाच्या काहिलीतही मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 2:07 PM

या ठिकाणी महायुतीचे राहुल शेवाळे आणि महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. 

अमर शैला -

मुंबई : मतदानाच्या दिवशी मुंबईतील तापमानाचा वाढलेल्या पाऱ्याचा मतदानावर परिणाम झाल्याचे चित्र दिसले तरी दक्षिण मुंबईत मात्र भर उन्हातही मतदारांचा उत्साह तसूभरही कमी झाला नसल्याचे दिसत होते. धारावीत उन्हाच्या काहिलीतही अनेक मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी महायुतीचे राहुल शेवाळे आणि महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. 

मतदारसंघातील माहीम, धारावी, प्रभादेवी, प्रतीक्षानगर भागात मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. उन्हाच्या झळा जाणवू लागल्यानंतर दुपारी १२ वाजेनंतर अनेक केंद्रांवरील गर्दी कमी झाली. परंतु सायंकाळी नंतर पुन्हा त्यात वाढ झाली. काही मतदान केंद्रांवर सुमारे १३०० हून अधिक मतदार होते. त्यामुळे या केंद्रांबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागत होता. 

शेड पडले अपुरे -  पत्नीसह मतदानासाठी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आलो होतो. तब्बल अडीच तासांनी म्हणजे दुपारी ३ वाजता मतदानाचा क्रमांक आला. -  एवढा वेळ रांगेत उभे राहावे लागले. मतदान धीम्या गतीने होत असल्याने बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत आहे, अशी तक्रार धारावी ट्रान्झिट कॅम्प येथील मतदार बबलू कुंचीकोरवे यांनी केली. -  धारावीतील ९० फूट रस्त्यावर कामराज स्कूलमधील मतदान केंद्राच्याबाहेर रस्त्यावरच मतदारांची रांग लागली होती. या शाळेत तीन मतदान केंद्र होते. मात्र मतदारांना रांगेत उभे राहण्यासाठी छोटे शेड उभारल्याने भर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अनेकांना उन्हात रांग लावण्याची वेळ आली होती.

सावळागोंधळ इथेही-  माहीम येथील सेंट झेवियर्स अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तब्बल २६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. यातील काही मतदान केंद्रेही कॉलेजच्या इमारतीत होती. तर अन्य काही मतदान केंद्रे शेड उभारून त्यात उभारली होती. मात्र या शेडमध्ये पंखे, तसेच कूलर बसवूनही दुपारच्या सुमारास उकाड्याचा त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत होता. त्यातून प्रशासनाच्या कारभारावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. -  एकाच कुटुंबातील सदस्यांचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर गेल्याचेही प्रकार घडले. वडिलांचे मतदान दुसऱ्या केंद्रावर आहे. तर माझे मतदान दुसऱ्या केंद्रावर आहे. त्यातच आईचे नावच मतदार यादीत सापडत नाही, अशी निवडणूक आयोगाचा सावळागोंधळ अधोरेखित करणारी प्रतिक्रिया विद्या नारायणकर या पहिल्यांदाच मतदान करत असलेल्या तरुणीने दिली. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४निवडणूक 2024