Join us

सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 7:20 AM

युवासेना आणि अभाविपच्या प्रत्येकी १० उमेदवारांत हा सामना रंगेल,

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बहुचर्चित अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होणार असून उद्धवसेनेची युवासेना आणि भाजपप्रणीत अभाविप या दोन संघटनांचे उमेदवार आमने-सामने आहेत. एकूण २८ उमेदवार ही निवडणूक लढवीत असून युवासेना आणि अभाविपच्या प्रत्येकी १० उमेदवारांत हा सामना रंगेल, अशी चर्चा आहे.  

विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सिनेटमध्ये कोण लढणार? कोण विद्यार्थ्यांचा आवाज विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचविणार? या कळीच्या प्रश्नांची उत्तरे २७ सप्टेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर मिळतील. दरम्यान, मतदारांची मने वळविण्यासाठी युवासेना आणि अभाविप या दोन्ही संघटनांच्या उमेदवारांनी सोशल मीडियापासून ते व्हॉइस कॉलपर्यंत सगळ्या प्रचार प्रकारांचा वापर केला आहे.

अभाविप आणि युवासेना यांच्याबरोबरच बहुजन विकास आघाडी आणि छात्रभारती याही संघटना रिंगणात आहेत. युवासेनेकडून खुल्या वर्गातून ५, तर इतर प्रवर्गांतून ५ असे एकूण १० उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. 

 २०१८च्या निवडणुकीत युवासेनेने बाजी मारून १० सदस्य निवडून आणले होते. यंदा अभाविपने युवासेनेला चितपट करण्यासाठी कंबर कसली आहे.

वंचितचा पाठिंबा 

बहुजन विकास आघाडीने ४, तर छात्रभारतीने एक उमेदवार उतरवला आहे. त्यांची या निवडणुकीत युती असून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनेही छात्रभारतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. 

जुळवाजुळव  

सिनेटची निवडणूक पसंतीक्रमाच्या मतांनुसार होते. त्यामुळे सध्या झालेली नोंदणी लक्षात घेता युवासेना वगळता इतर सर्वच उमेदवारांचे दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांसाठी संघटनांकडून काय व कशी राजकीय जुळवाजुळव केली जाते याकडे लक्ष असेल.

मनविसेकडून उमेदवार नाही

सन २०१८मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे १० सदस्य निवडून आणल्यामुळे यावेळी युवासेनेला टक्कर देण्यासाठी मनसेची विद्यार्थी संघटना निवडणुकीत उतरेल, अशी चर्चा होती. 

मात्र, मनविसेने एकही उमेदवार दिला नाही; परंतु मनविसेने अधिकृत उमेदवार दिला नसला, तरी मनविसेचे सचिव सुधाकर तांबोळी हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मनविसेतील नाराजी अधोरेखित झाली आहे. 

विद्यार्थी चळवळीतील अनुभवामुळे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही सिनेटवर तांबोळी यांची यापूर्वी नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे ते तगडे अपक्ष उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबई