Join us

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू

By मनोहर कुंभेजकर | Published: November 03, 2022 10:26 AM

सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलासह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई  : महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर कालपासूनच आवश्यक ती जय्यत तयारी करण्यात आली होती. तर आज पहाटे ६ वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी वर्ग कर्तव्यावर उपस्थित होते. तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलासह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

आज सकाळी ठीक ७ वाजल्यापासून प्रत्यक्ष सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे सुरू झाली आहे. अंधेरी पूर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी ही माहिती दिली.

ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे), बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स, मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी), नीना खेडेकर (अपक्ष), फरहाना सिराज सय्यद (अपक्ष), मिलिंद कांबळे (अपक्ष), राजेश त्रिपाठी (अपक्ष) हे ७ उमेदवार पोटनिवडणूकीच्या रिंगणात आहेत.

अंधेरी पूर्व मतदार संघातील सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करावे व आपले लोकशाही विषयक पवित्र कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :मतदानअंधेरीनिवडणूक