विधान परिषदेसाठी आज मतदान! चार जागांसाठी सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 06:03 AM2024-06-26T06:03:45+5:302024-06-26T06:04:07+5:30

चार जागांसाठी सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला? १ जुलै रोजी निकाल

Voting today for Legislative Council Who do educated voters think for four seats | विधान परिषदेसाठी आज मतदान! चार जागांसाठी सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला?

विधान परिषदेसाठी आज मतदान! चार जागांसाठी सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला?

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: विधानसभेची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी बुधवार, २६ जून रोजी मतदान होत आहे. राज्यातील सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला मिळणार, हे या निवडणुकीच्या निमित्ताने समजणार आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत चार जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला होऊन निकाल जाहीर केले जातील, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंती क्रमाने मतदान होते. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता आहे.

विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीत मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक मतदारसंघात तिन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत, ही रणनीती असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे. मात्र, यात नेमकी कोणती रणनीती आहे, हे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी महायुतीने मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत तर महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

मुंबईत भाजपचे आव्हान
गेली ३० वर्षे मुंबई पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असलेल्या उद्धवसेनेला भाजपने यावेळी आव्हान दिले आहे. मुंबई पदवीधरमध्ये एकूण आठ उमेदवार रिंगणात असून, मुख्य लढत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात होणार आहे. मतदारसंघात १२ हजार पदवीधरांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत, या अनिल परब यांच्या आरोपामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबईतील १ लाख २० हजार ६७३ मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांचे भवितव्य निश्चित करतील.

मतमोजणी - नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनमध्ये १ जुलै, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

हेल्पलाइन - मतदारयादी तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी हेल्पलाइन आहे. मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा आहे की नाही, याबाबतची माहिती हेल्पलाइनवर मिळू शकेल.

निरंजन डावखरे हॅ‌ट्ट्रिकवर - कोकण पदवीधर मतदारसंघात १३ उमेदवार असले, तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत होणार आहे. निरंजन डावखरे सलग तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ते हॅटट्रिक साधतात का, याबद्दल उत्सुकता आहे.

नैमित्तिक रजा सवलत
अधिकाधिक मतदारांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने यापूर्वीच २६ जून रोजी नैमित्तिक रजा जाहीर केली आहे: परंतु, खासगी आस्थापनांवर काम करणाऱ्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा लागू होत नसल्याने त्यांच्यासाठी मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत देण्यात आल्याचे कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी सांगितले.

मुंबई शिक्षकमध्ये चौरंगी
मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिवसेना शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे हे पाच प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत. 

मुंबई पदवीधर - अनिल परब (उद्धवसेना) विरूद्ध किरण शेलार (भाजप)
मुंबई शिक्षक - जगन्नाथ अभ्यंकर (उद्धवसेना) विरूद्ध शिवाजी नलावडे (राष्ट्रवादी, अजित पवार गट)
कोकण विभाग पदवीधर - रमेश कीर (काँग्रेस) विरूद्ध निरंजन डावखरे (भाजप)

Web Title: Voting today for Legislative Council Who do educated voters think for four seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.